मुंबई: करोनाबाधीत रुग्णाचे निधन झाल्यास मृतदेहाचे फक्त दहन करता येईल, असे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एका परिपत्रकाद्वारे सोमवारी काढल्याने एकच खळबळ उडाली. या आदेशानंतर पालिकेवर प्रश्नांची सरबत्ती होऊ लागल्याने अवघ्या तासाभरातच हे परिपत्रक पालिकेला मागे घ्यावे लागले. दरम्यान, पालिकेने आता सुधारित परिपत्रक जारी केले असून मोठ्या जागेतील कब्रस्तानात अशा व्यक्तीला दफन करता येईल, असा बदल केला आहे.
करोनाबाधीत रुग्णाचे निधन झाल्यास मृतदेहाचे फक्त दहन करता येईल, असे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एका परिपत्रकाद्वारे आज दिले होते. दफन केल्यास करोनाचा विषाणू वातावरणात पसरण्याची भीती असल्याने ही खबरदारी पालिकेने घेतली आहे. तसेच अंत्यसंस्काराच्या वेळेस फक्त पाच जणांनाच परवानगी दिली जाणार आहे. करोनाबाधित मृताचे दफन करायचे असल्यास मुंबई महापालिकेच्या हद्दीबाहेर करता येईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र, या परिपत्रकामुळे वादाला तोंड फुटले. अनेकांनी या परिपत्रकावर आक्षेप घेतला.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तातडीने पालिका आयुक्तांशी चर्चा केली व या परिपत्रकाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. या चर्चेनंतर पालिका आयुक्तांनी तातडीने हे परिपत्रक मागे घेतले आहे. याबाबत नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

अधिक वाचा  शक्तिपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवलं