करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भाव अजूनही स्थानिकच असून त्याची लागण समुदायाअंतर्गत झालेली नाही. तसे झाल्यास त्याचीही लोकांना माहिती दिली जाईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी देण्यात आले. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ९२ नवे करोना रुग्ण आढळले असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सांगितले.
करोना रुग्णांसंदर्भातील दस्तऐवजामध्ये ‘स्थानिक व काही प्रमाणात समुदायाअंतर्गत प्रादुर्भाव’ असा शब्दप्रयोग केला गेला होता. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भावाने तिसऱ्या टप्प्यांत प्रवेश केल्याची शंका व्यक्त केली गेली. त्याबाबत अगरवाल यांनी स्पष्टीकरण देताना अजूनही करोनाचा प्रादुर्भाव स्थानिकच असल्याचे सांगितले. समुदाय हा शब्द वैद्यकीय क्षेत्रात आम्ही वापरत असलो तरी ‘तिसरा टप्पा’ या अर्थाने वापरलेला नसल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
करोनाच्या महासाथीच्या प्रादुर्भावाचे चार टप्पे असून परदेशात जाऊन आलेल्या प्रवाशांना करोनाची बाधा होते हा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये या बाधित प्रवाशांच्या संपर्कात आल्याने स्थानिकांना बाधा होते. तिसऱ्या टप्प्यांमध्ये रोगाची बाधा परदेशात न गेलेल्या लोकांनाही होते व बाधितांची संख्या वाढत जाते व बाधा कुणामुळे झाली त्याचा स्रोत समजू शकत नाही. या टप्प्यावर रुग्णांचे प्रमाण थोडय़ा कालावधीत प्रचंड वाढते. हा तिसरा टप्पा म्हणजे समुदायाअंतर्गत प्रादुर्भाव. पण या टप्प्यापर्यंत अजून पोहोचलो नसल्याचे अगरवाल म्हणाले.
देशात टाळेबंदी सुरू असताना रुग्णांची संख्या १०० वरून १००० होण्यास १२ दिवस लागले. अन्य विकसित देशांमध्ये रुग्णांची संख्या ३ ते ५ हजारांवर पोहोचली. काही देशांमध्ये तर ती ८ हजारांवर गेली आहे. तुलनेत भारतात लोकसंख्या जास्त असून जनतेचे सहकार्य, केंद्र व राज्य सरकारांकडून केले जात असलेले प्रतिबंधात्मक उपाय यांचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे अगरवाल म्हणाले.
घाबरू नका, माहिती लपवू नका!
ज्या भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले तिथे सार्वजनिक ठिकाणे, बंदिस्त ठिकाणे तसचे, स्वच्छतागृहे आदी र्निजतूक करण्याचा आदेश देण्यात आला असून त्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. करोनासंदर्भात लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. जनजागृती करण्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. करोना टाळण्यासाठी काय केले पाहिजे आणि टाळले पाहिजे हे जाणून घेतले आणि त्याचे पालन केले तर एकत्रितपणे करोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याआधी बाधा झाल्याचे समजू शकले तर उपचार करता येऊ शकतात. बाधा झाल्याची थोडी जरी शंका आली तर त्या व्यक्तीने घाबरू नका, माहिती लपवू नका. सरकारच्या माहिती संपर्क क्रमांकाशी संवाद साधा. लगेचच वैद्यकीय सल्ला देता येऊ शकतो, असे आवाहनही अगरवाल यांनी केले.
करोनाची स्थिती
* एकूण रुग्ण – १०७१
* एकूण मृत्यू – २९
* २४ तासांमधील रुग्ण – ९२
* २४ तासांमधील मृत्यू ४
आत्तापर्यंत ३८,४४२ वैद्यकीय चाचण्या
आत्तापर्यंत ३८,४४२ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून रविवारी दिवसभरात ३,५०१ चाचण्या झाल्या. चाचण्यांचे प्रमाण आणखी ३० टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता वैद्यकीय प्रयोगशाळांकडे आहे. ११५ सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून ३१ खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये १,३३४ चाचण्या केल्या गेल्या. रविवारी ४२८ चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये झाल्या, अशी माहिती अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

अधिक वाचा  सातासमुद्र पार ‘जय भीम’ नारा! महामानवाला अभिवादन! किली पाॅलचे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल