नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान अफवांचा बाजार तेजीत आहेत. करोना संदर्भात, लॉकडाऊन संदर्भात अनेक वेगवेगळ्या अफवा सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असताना दिसत आहेत. यातलीच एक अफवा म्हणजे ‘एप्रिल महिन्यात देशात आणीबाणी लागू करून लष्कराला रस्त्यावर उतरवण्यात येणार आहे’. या अफवेवर प्रत्यूत्तर देण्यासाठी खुद्द लष्करालाच समोर यावं लागलंय. करोना व्हायरसचा धोका आणि देशव्यापी लॉकडाऊन अतिशय कठिण अशा परिस्थितीत सेनेनंच समोर येऊन या अफवेचं खंडन केलंय.
‘एप्रिल महिन्यात देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर होऊ शकते, असा खोटा आणि चुकीचा संदेश सोशल मीडियाद्वार देशात पसरवला जात आहे. यामध्ये सेना, माजी सैनिक, एनसीसी आणि एनएसएसच्या मदतीनं ही आणीबाणी लागू केली जाईल, असाही उल्लेख आहे. ही केवळ अफवा आहे’ असं लष्करानं ट्विट केलंय.
‘लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची योजना नाही’
या अगोदर, लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, अशा आशयाच्या अफवांवर सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे हे दावे खोटे असून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय.
सामूहिक अंत्यसंस्काराची अफवा
यापूर्व, भारतीय लष्कराला सामूहिक अंत्यसंस्काराची ट्रेनिंग दिली जात असल्याचा एक संदेश व्हायरल होताना दिसला होता. यामध्ये, करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अगणित असेल आणि याचा सरकारला अंदाज आहे. म्हणूनच लष्कराला सामूहिक अंत्यसंस्काराचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरदेखील लष्करानं स्पष्टीकरण दिलं होतं.
अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई
उल्लेखनीय म्हणजे, करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची भूमिका घेतलीय. तुम्हीही तुमच्याकडे एखादा मॅसेज आल्यानंतर तो पुढे पाठवण्याअगोदर त्याची नक्कीच खात्री करून घ्या.