हैदराबाद: येत्या ७ एप्रिलपर्यंत आमचे संपूर्ण राज्य कोरोनामुक्त होईल, असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, तेलंगणात आतापर्यंत कोरोनाचे ७० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ११ जण उपचारामुळे कोरोनातून बरेही झाले. त्यांच्या कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्या असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. त्यामुळे आता तेलंगणात कोरोनाचे केवळ ५८ रुग्ण उरले आहेत.
राज्यात कोरोनाचे एकूण २०७ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
याशिवाय, परदेशातून आलेल्या २५,९३७ लोकांवर आम्ही नजर ठेवून आहोत. या सर्व लोकांचा क्वारंटाईनचा कालावधी ७ एप्रिलला संपत आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या संशयितांमध्ये भर पडली नाही तर ७ एप्रिलनंतर तेलंगणात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल. मात्र, तोपर्यंत लोकांनी आत्मसंयम बाळगणे गरजेचे असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या लोकांना निर्वाणीचा इशारा दिला होता. लोकांनी ऐकले नाही तर तेलंगणात लष्कराला पाचारण करून कर्फ्यु लागू करावा लागेल. तसेच रस्त्यावर येणाऱ्या लोकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील. कृपया सरकारवर ही वेळ आणू नका, असे चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना बजावले होते.
दरम्यान, भारतात कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११०० वर पोहोचली आहे. आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ९५ जण कोरोनाच्या संसर्गातून बरेही झाले आहेत.

अधिक वाचा  विधानसभेत मविआ किती जागा जिंकणार? पवारांनी थेट आकडा सांगितला …288जागेवर मला चित्र असं दिसतंय!