नागपूर: चाकूचा धाक दाखवून कुख्यात गुंडाने २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना अंबाझरी भागात उघडकीस आली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी सतीश ताराचंद चन्ने (रा. पांढराबोडी) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सतीश हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने पोलिसांसमोर चाकूने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २०१७मध्ये सतीश हा साथीदारांसह पीडित २१ वर्षीय तरुणीच्या घरी गेला. मला ती आवडते, तिचे अन्य युवकासोबत लग्न केल्यास याद राखा, अशी धमकी त्याने पीडित तरुणीच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर काही दिवसांनी सतीश याने तरुणीला अंबाझरीतील एका झोपडीत नेले. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सतीश हा तिच्यावर सतत अत्याचार करायला लागला. पीडित तरुणीने विरोध केला असता तो तिच्या आई-वडिलांना मारहाण करायचा. त्याच्या अत्याचाराला तरुणी कंटाळली. तिने मैत्रिणीला याबाबत सांगितले. मैत्रिणीने तिला धीर दिला. अंबाझरी पोलिस ठाण्यात नेले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका प्रकरणात सतीश हा सध्या कारागृहात आहे.
अंबाझरीत वाढली गुंडगिरी
गांजा विक्रेता सुलतान याच्या त्रासाला कंटाळून सुमारे दहा दिवसांपूर्वी अंबाझरीतील नागरिकांनी पोलिस ठाण्यात घेराव घातला होता. त्यानंतर आता सतीश याच्या अत्याचाराची प्रकरणं उघडकीस आली. या भागात गुंडगिरी वाढली असून, पोलिसांचा गुंडावर कोणताही वचक नाही, असा आरोप होत आहे. या दोन्ही घटनांनी अंबाझरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.