बारामती : शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. रुग्णाला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
श्रीरामनगर परिसरातील हा रुग्ण बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा त्रास वाढल्याने त्यास पुण्यातील ससूनला हलवण्यात आले होते. आता त्याला नायडू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. संबंधित रुग्ण हा रिक्षा चालक असल्याने तो बारामती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने रिक्षा फिरवली असावी. तसेच त्याच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची इतर नागरिकांना बाधा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकर्तता बाळगावी, घरातच राहावे, घराबाहेर फिरू नये, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी स्वतःहून जनता कर्फ्यू लागू करून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी केलं आहे.
श्रीराम नगर केले सील…
शहरातील श्रीराम नगर हे केंद्र माणून त्याच्या आजूबाजूचा 3 किलोमीटरचा परिसर क्वारंटाइन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा यांना यातून वगळले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.
रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांच्यासह मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला. त्यांनी हा संपूर्ण परिसर सील केला. स्पिकरवरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. नगर पालिकेचे अधिकारी- कर्मचारी व आरोग्य विभागाच कर्मचारी या भागात दाखल झाले.
श्रीराम नगरात राहाणाऱ्या सर्व कुटुंबियांची तपासणी बारामती नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश कडुसकर व डॉ. सदानंद काळे यांनी दिली. बारामती नगरपालिकेच्या वतीने या भागात तातडीने निर्जंतुकीकरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बारामतीत रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील हा पहिलाच रुग्ण आहे. त्याच्या सहवासात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम आता प्रशासनाने सुरु केले आहे. या संबधी कोणतीही माहिती बारामतीत प्रशासनाने माध्यमांना दिली नाही. उलट माहिती दडवण्याचाच प्रयत्न केला जात होता.

अधिक वाचा  महाराष्ट्रात भाजपच सर्वात मोठ नुकसान मोठे फेरबदल? 2 कॅबिनेट 4 राज्यमंत्रीपद, नेमकी कुणाकुणाला संधी?