मुंबई : कोरोनाचं संकट ओढावलं असताना अनेक उद्योगपती, कलाकार, खेळाडू मदतीसाठी सरसावले आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाच्या लढ्यासाठी 25 कोटी रुपये दान केल्यानंतर अनेकांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत का केली नाही असा प्रश्न विचारला. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या बिग बींनी कोरोनाबाबत जनजागृतीचं अभियान चालवलं आहे.
आता अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर केला आहे. बच्चन यांचा हा फोटो बराच जुना आहे. फोटोसोबत त्यांनी एक कविता शेअर केली आहे. त्यातून बिग बींनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीवरून विचारण्यात येणारे प्रश्न आणि चर्चा यांना पूर्णविराम दिला आहे. कवितेत बिग बींनी म्हटलं आहे की, काही लोक मदत करतात आणि ते सांगतात तर काही लोक मदत करतात पण काहीच सांगत नाहीत. मला त्या दुसऱ्या प्रकारात रहायचं आहे आणि त्यातच राहु द्या. ज्यांना मदत मिळते त्यांना माहिती नसतं त्यांना कोणी मदत केलीय. फक्त त्या लोकांचं दु:ख समजून घ्या. या परिस्थितीत काय सांगायचं. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे. माझा स्वभावच कमी बोलण्याचा आहे.
बीग बींनी कवितेच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका कऱणाऱ्यांना उत्तर दिलं असंही म्हटलं जात आहे. अक्षय कुमारने पंतप्रधान सहायता निधीमध्ये 25 कोटी रुपये दान केल्याचं म्हटलं. त्यानंतर इतर बॉलिवूड कलाकार कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित केला गेला. अशा परिस्थितीत अमिताब बच्चन यांनी कविता पोस्ट करून मदत करण्याबाबत ट्रोल करणाऱ्यांना गप्प केलं आहे.