रांची : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा (Covid – 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. दिवसभर काम करुन पैसे कमवणाऱ्या या वर्गाला लॉकडाऊनमध्ये कसं जगावं? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यातून मार्ग काढणाऱ्यांच कौतुक आहे. त्यांच्यातील लढवय्येपणाला सलाम करावासा वाटतो. झारखंडमधील रांची येथे उर्मिला देवी आणि राजू दास हे रोजंदारीवर काम करीत होते. उर्मिला देवी एका गार्मेंटच्या दुकानात काम करीत होत्या. तर त्यांचा पती राजू दास लग्न सोहळ्यात वाजंत्रीचं काम करीत होता. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून लग्नसोहळे रद्द झाल्याने त्याच्याकडे काहीच काम नाही.
गार्मेंट बंद झाल्याने उर्मिलाही कामाच्या शोधात आहे. त्यातच हातावर हात ठेवून बसून राहिल्याने काही साध्य होणार नाही हे त्यांच्या लक्षात आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. सध्या भाजीचा व्यवसाय चांगला चालेले असं त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यासाठी त्यांनी लोन घेतलं आणि हा भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पैसे कमवायचे असेल, पोट भरायचं असेल तर काहीतरी उपाययोजना कराव्या लागतात. तुमची जिद्द असेल तर मार्ग सापडतात. लॉकडाऊनमध्येही न हरता हे दांम्पत्य उभं राहिलं. हातातलं काम गेलं तर भाजी विकून संसार उभा केला.

अधिक वाचा  NEET कौन्सिलिंगबाबत मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय काय?