पुणे : राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात 52 वर्षाच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1024 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. आतापर्यंत 96 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत 106 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 96 जणांनी हा यशस्वी लढा दिल्यानं दिलासा व्यक्त केला जात आहे. भारतात कोरोनाची वाढणारी संख्या लक्षात घेता 14 एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाऊन वाढणार का अशी एका भीतीही व्यक्त केली जात आहे.
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारपर्यंत 155 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आहे. मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.