बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच बागेतील फळे, भाजीपाला शेतकऱ्यांना मार्केट घेऊन जाता येत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.
एकीकडे राज्यभरात शेतकऱ्यांची ही स्थिती असतानाही बारामतीच्या प्रल्हाद वरे या शेतकऱ्याने आपली शक्कल लढवत शेतातील माल शेतातच विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या मालास ग्राहक शेतातच येऊन विकत घेऊन जात आहेत. बारामती तालुक्यातील मळद गावातील प्रल्हाद वरे या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात सहा एकरात कलिंगडाच्या विविध जातींच्या वाणाची पेरणी केली होती.
सध्या त्यांच्या शेतातील कलिंगड, टरबूज विक्रीसाठी तयार झालेले आहेत. मात्र कोरोना मुळे वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार नाही, ग्राहक अशी अवस्था सध्या बाजारात आहे. मात्र प्रल्हाद वरे यांनी शक्कल लढवत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक तसेच फोन कॉल करून ग्राहकांना थेट शेतातच बोलावले आहे. ग्राहकदेखील त्यास चांगला प्रतिसाद देत आहेत. शेतातच विक्री व्यवस्था सुरू केल्याने त्यांचे होणारे मोठे नुकसान टळले आहे.
प्रल्हाद वरे यांनी सध्या त्यांच्या शेतालगतच एक छोटासा स्टॉल उभा केला आहे. मळद व निरावागज रोडवरच हा स्टॉल असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कुठलीही गर्दी न करता त्यांच्या मालाची विक्रीची व्यवस्था ते करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी वरे यांनी खाजगी कंपनीची बियाणे आणून विविध रंगाचे असलेल्या कलिंगड व खरबूज याची लागवड केली होती. हे कलिंगड रंगीत असून याचा आत मधील गर पिवळा आहे, तर खरबूज वरून गर्द पिवळे व आतून गर पांढरा असल्याने चवीला गोड लागत आहे. त्यामुळे याकडे ग्राहक वर्गाची पसंती आहे.
ग्राहकांची मागणीही वाढत असल्यानं व्यापारी व शेतकरी, ग्राहक शेतातून माल घेऊन जात आहेत. ग्राहकांनी फळे व भाजी विक्री स्टॉलवर गर्दी न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती आवश्यक गोष्टी खरेदी केल्या तर दोघांचीही गरज भागेल व यातून शासनाच्या आदेशाचे पालन ही होईल व ग्राहकांना ताजी फळे,भाजीपाला मिळेल.आणि शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळतील असे वरे यांनी सांगितलं.

अधिक वाचा  मोठी बातमी : वाल्मिक कराडची मातोश्री मैदानात, लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या