सध्या करोना विषाणूपासून बाचावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हँड सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढली आहे. अशा काळात लाखो रुपयांच्या सॅनिटायझरच्या बाटल्यांचा साठा मुंबई पोलिसांनी पकडला आहे. चारकोप पोलिसांनी रविवारी ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील चारकोप भागातील एका घरामध्ये हँड सॅनिटायझरच्या बाटल्यांचा बेकायदा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. अशा प्रकारे साठा करुन कृत्रिम टंचाई निर्माण करीत नंतर तो वाढीव किंमतीत विकण्याचा या टोळीचा डाव होता. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी रविवारी संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि लाखो रुपयांचा माल जप्त केला. तसेच ३० आणि ३१ वर्षीय दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोघेही कांदिवलीचेच रहिवासी आहेत.
या छाप्यात पोलिसांनी ZUCI कंपनीच्या १०० मिलीच्या २३०० बाटल्या, ५०० मिलीच्या ७५०० बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्यांची एकूण किंमत १०, २८, ५०० रुपये इतकी आहे. सरकारने १३ मार्च २०२० रोजी काढलेल्या नोटिफिकेशनुसार सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश होतो. त्यामुळे याचा साठा करणाऱ्या आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनीच एक धडक कारवाई करीत सर्जिकल मास्कचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर सध्याच्या परिस्थितीतील ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने प्रशिक्षित बौद्धाचार्यांच्या परीक्षा परीक्षाकेंद्रात शिस्तबद्ध वातावरणात संपन्न