नगर : ‘करोना’मधून रुग्ण बरे होऊ शकतात, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. केवळ त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आपण सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे,’ अशा भावना ‘करोना’वर मात करून त्यामधून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या. संबंधित रुग्णाला रविवारी बूथ हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. रविवारी ‘आयसोलेशन वॉर्ड’च्या बाहेर आल्यानंतर संबंधिताला पुष्पगुच्छ देऊन बूथ हॉस्पिटल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. तसेच बूथ हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत त्याला निरोप दिला.
जिल्ह्यात ‘करोना’चा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सापडला होता. सर्दी, खोकला, ताप अशी कोणतीही लक्षणे त्याच्यामध्ये आढळली नव्हती. बूथ हॉस्पिटलमध्ये त्याला ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. हे उपचार यशस्वी झाले असून या रुग्णाची १४ दिवसांनंतरची घेण्यात आलेली स्राव नमुना चाचणी निगेटिव्ह आली होती. नियमानुसार २४ तासांनी दुसरी स्राव नमुना चाचणी घेण्यात येते. त्यासाठी शनिवारी स्राव नमुना पुणे येथे पाठवला होता. त्याचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याने संबंधित रुग्णाने ‘करोना’वर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला रविवारी घरी सोडण्यात आले. या वेळी संबंधित रुग्णाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, ‘जवळपास दोन आठवड्यांपासून मी बूथ हॉस्पिटलमध्ये ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये आहे. जिल्हा प्रशासन व बूथ हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी माझी अतिशय व्यवस्थित काळजी घेतली. माझ्याकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिले. ‘करोना’ला तुम्हीही घाबरून जाऊ नका. हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आपणच आपली काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.’
या रुग्णावर उपचार करणाऱ्या बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर करोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधून त्यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी आरोग्य यंत्रणेबद्दल माहिती घेतली.
‘आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब आहे,’ असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. ‘आपल्या आरोग्य यंत्रणेने अतिशय कष्ट घेतले. त्या रुग्णावर उपचार करणारे सर्व डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांचे काम कौतुकास्पद आहे. ‘करोना’ संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलिस प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वतःच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

अधिक वाचा  शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांचं भाषण, आंदोलकांकडून ‘ एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा