करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी अडकलेल्या हजारो लोकांच्या जेवणाची चिंता मिटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. रेल्वे परिसरासह शहरातील सहा हजार जणांना जेवण पुरवण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे. त्यामुळे आज, रविवारपासून हातावर पोट असलेल्या हजारो सर्वसामान्यांच्या जेवणाची चिंता मिटणार आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या पश्चिम विभागातील सात बेस किचनमध्ये जेवण बनवण्यात येते. या किचनमधून राजधानीसह अन्य एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यात येतात. सध्या प्रवासी वाहतूक बंद आहे. यामुळे या किचनमधून जेवण बनवून ते गरजूंना वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मुंबई सेंट्रल येथील किचनच्या माध्यमातून प्रत्येकी तीन हजार लोकांसाठी जेवण बनवण्यात येणार आहे. विविध डाळींपासून बनवण्यात आलेली पौष्टिक डाळ-खिचडी आणि लोणचे असे या जेवणाचे स्वरूप असेल. प्रत्येकाला सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे जेवणाचे पाकीट मोफत देण्यात येईल,’ असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे संघ महाव्यवस्थापक राहुल हिमालयन यांनी सांगितले.
बेस किचन चालवणारे कंत्राटदार जेवण बनवणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना शहरातील अन्य गरजूंना जेवण वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रविवारपासून हे जेवण गरजूंना वाटण्यात येईल, असे हिमालयन यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय भांडारमधून तूर-मूग डाळ, तांदूळ असा कच्चा माल आणून सध्या जेवण बनवण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास रोज १० ते १२ हजार गरजूंना पुरेल इतके जेवण पुरवण्याची क्षमता आयआरसीटीसीच्या बेस किचनमध्ये आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा  मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री; 24 राज्यांत मंत्रिमंडळाचा विस्तार