पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुणे महानगरपालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता नेमलेल्या पथकांना आवश्यक असलेल्या डिजीटल इन्फ्रारेड थर्मामिटरची खरेदी केली जाणार असून याद्वारे नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर पालिकेने नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आरोग्य विभाग, स्थानिक क्षेत्रीय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके निर्माण करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय् स्तरावर ही पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांना नागरिकांच्या घरी जाऊन कोणाला ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोना सदृश लक्षणे आहेत का याची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली. आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य या पथकांना पुरविण्यात आले.
पालिकेकडे उपलब्ध असलेले थर्मामीटरही या पथकांना देण्यात आले. या थर्मामिटरद्वारे नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. पालिकेच्या दवाखान्यांमधील डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांनी पालिकेकडेही डिजीटल थर्मामीटर असावेत अशी मागणी केली आहे. त्यानुसार, पालिकेचा आरोग्य विभाग आता तब्बल २०० डिजीटल थर्मामिटर खरेदी करणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मागणी आणि तपशीलवार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या आहेत.
डिजिटल थर्मामीटरचा काय होणार फायदा
डिजिटल थर्मामीटरमुळे नागरिक तपासणी करणारे कर्मचारी यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहणार आहे. लांबूनच इन्फ्रारेड किरणांच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंगात किती ताप आहे , शरीराचे तापमान नेमके किती आहे हे समजू शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केल्या जाणाऱ्या या थर्मामीटरचा उपयोग नंतरही दवाखान्यांमध्ये केला जाऊ शकतो.

अधिक वाचा  कोल्हापूरमध्ये वारसाहक्क वाद तरीही पुन्हा मुश्रीफांचा छत्रपतींना इशारा “महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”