रियाध: करोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक देशांत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अनेक नियमही नव्याने तयार करण्यात आले आहेत. सौदी अरेबियात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. एका शॉपिंग सेंटरमधील ट्रॉली आणि दरवाजावर थुंकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते. ही व्यक्ती परदेशी नागरिक असल्याचे समजते. ही व्यक्ती शॉपिंग सेंटरमध्ये असताना ट्रॉली आणि दरवाज्यावर थुंकला. त्यावेळी शॉपिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी या व्यक्तीला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
या व्यक्तीने असे कृत्य का केले, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. करोनाची बाधा झाली आहे का, हे या व्यक्तीला माहीत होते का, याबाबतही काही स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सर्दी-खोकल्याचा त्रास आधीपासून होता. या कृत्य हे इतरांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे समजण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली आहे.
या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीनंतर शॉपिंग सेंटरमध्ये जाणाऱ्या व्यक्तींना करोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात येत आहेत. सौदी अरेबियात आतापर्यंत ११०४ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जणांनी करोनावर मात केली आहे.

अधिक वाचा  लेबनॉनमध्ये पेजर स्फोटानंतर आता वॉकीटॉकीमध्ये स्फोट, 3 ठार; अनेक जखमी