पुणे: उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पुण्याला शनिवारी दुपारी पुन्हा वादळी पावसाने झोडपले. वादळी वारे, मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने उपगनरांमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले, तर काही भागांत झाडांच्या फांद्या कोसळल्या. पुणे जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. अजून दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
आठवडाभर उन्हाची तीव्रता अनुभवत असतानाच सलग तिसऱ्या दिवशी पावसाने मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्यात ढगाळ वातावरण होते, पण पाऊस पडला नाही. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये गारांचा पाऊस पडला. आज मात्र (शनिवार) पुन्हा वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पुण्याला झोडपले.
पूर्व मध्य अरबी समुद्रापासून एक किलोमीटर उंचीपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ यांच्यासह दक्षिण मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. याचबरोबर जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये उत्तर कर्नाटक ते अग्नेय राजस्थानपर्यंत आणखी कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार झाले असून वाढलेले तापमान आणि बाष्प यांच्या संयोगामुळे राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडतो आहे, असे हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी सांगितले.
उपनगरात वीजपुरवठा खंडीत
पुण्यात शनिवारी सकाळपासून उकाडा वाढला होता. दुपारी एक नंतर आकाश ढगाळ झाले. उकाडा वाढला आणि चारच्या दरम्यान जोराचा वारा सुटला आणि सहा वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्याला वेग असल्यामुळे काही भागात झाडाच्या फांद्या कोसळल्या. तर काही ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. फांद्या पडल्यामुळे उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा आला होता. शहरात दिवसभरात १९.८ अंश सेल्सिअस किमान आणि ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही विजांच्या कडकडाटसह पाऊस पडला.
भाजीपाला आता थेट विद्यापीठात
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यातील नीचांकी तापमान १८.४ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये आणि कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस सोलापूरमध्ये नोंदविण्यात आले.