बिजींग – करोना रोगाच्या संबंधात सुरुवातीच्या काळात चीनने ही माहिती दडवून ठेवल्याचा आरोप जगभरातून केला जात आहे. तथापी त्यानंतर करोनाच्या बाबतीत चीनने केलेली उपाययोजनाच निर्णायक ठरली असून आता या रोगावर चीनने ज्या प्रभावीपणे नियंत्रण ठेवले आहे त्याचा धडा चीनच्या शेजारी असलेल्या भारताने घेण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
चीनने आपल्या हुबेई प्रांतात प्रथम लॉकडाऊन जाहीर करीत तेथील लोकांना बाहेर पडण्यास अत्यंत कठोरपणे प्रतिबंध घातले. त्या प्रदेशातून वाहनांची येजा त्यांनी काटेकोरपणे थांबवली. त्या प्रांतातील सुमारे 5 कोटी 60 लाख लोक 23 जानेवारीपासून लॉकडाऊन अवस्थेत होते. त्या प्रांतात 81 हजारांपैकी 68 हजार करोनाग्रस्त आढळले होते. भारताने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्याबद्दल काही तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण चीनने फक्ते हुबेई प्रांतातच लॉडाऊन जाहीर केले होते. त्या अडचणीच्या काळात संपूर्ण चीन देश ठप्प झाला होता; पण त्या देशाचे बहुतांशी व्यवहार खुलेच ठेवण्यात आले होते.
चीन मध्ये करोनाचा पहिला रुग्ण नोव्हेंबर महिन्यात आढळून आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी लोकांना या रोगाच्या प्रसाराविषयी जाहीर सल्ले दिले होते पण चीनने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या रोगाने साऱ्या जगाची झोप उडवली आहे.चीनने त्याचवेळी यावर प्रभावी उपाययोजले असते आणि हा रोग झाकण्याचा प्रयत्न केला नसता तर जगाला त्याचा एवढा ताप झाला नसता.
जानेवारी महिन्यात या रोगाने तेथे मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले होते. जानेवारी महिन्यात चीन मध्ये नव वर्षाच्या स्वागतासाठी लोक सुट्ट्या घेऊन मोठ्या प्रमाणात पर्यटनाला बाहेर पडत असतात. एकट्या हुबेई प्रांतातील सुमारे 50 लाख लोक देश विदेशात पर्यटनासाठी बाहेर पडले होते. त्यांच्या मार्फतच जगभर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तथापि त्यानंतर मात्र चीनने आपल्या देशातील हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी प्रभावी उपाययोजना केली त्याचा बोध घेऊन संपूर्ण जगात आता त्याच धर्तीची उपाययोजना करावी लागणार आहे.
चीने वैद्यकीय उपायांसह आर्थिक उपाययोजनाही अत्यंत परिणामकारकपणे केली आहे. लॉकडाऊन अवस्थेतील लोकांना घरपोच जीवनावश्वक वस्तुंचा पुरवठा हे या उपाययोजनेतील आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळे लोकांना विनाकारण बाहेर पडण्याची गरजच निर्माण झाली नाही. त्याखेरीज चीनने घरपोच अन्न व अन्य वस्तुंची सेवा देणाऱ्या ताओबाओ, अलिबाबा आणि अन्य ईकॉमर्स कंपन्यांना बंदी घातली नव्हती, त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा ही समस्याच तेथे उद्भवली नाही. त्या भागातील नागरीकांच्या तापाच्या तपासणीसाठी चीनने सर्व निवासी संकुलांचा अ्रत्यंत प्रभावी उपयोग करून घेतला. त्यामुळे एकूणएक नागरिक तपासला गेला.
वुहान आणि हुबेई मधून बाहेर प्रवास करून आलेल्या नागरीकांचा शोध चीनने आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणेमार्फत घेतला. आणि त्यांनी त्यांच्या आरोग्य तपासणीवर लक्ष केंद्रीत करीत त्यांना क्वारंटाईन अवस्थेत ठेवले होते. त्यामुळे त्यांच्यापासून करोना प्रसाराचा मार्ग बंद झाला. हुबेई प्रांतात चीनने लष्करी वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित केली होती व लष्करी जवानांचाही त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर करून घेतल्याने सर्व उपाययोजना नियोजीतपणे पार पाडता आल्या.
करोनाग्रस्तांवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अत्यंत कमी वेळात अनेक मोठी हॉस्पीटल्स आणि केंद्रे उभी केली. त्यामुळे करोनाग्रस्तांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची व्यवस्था करणे सोपे गेले. चीनने सर्व सरकारी यंत्रणा अत्यंत परिणामकारकपणे कामाला लावली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात टीकेचे लक्ष्य बनलेला चीन आज जगाच्या कौतुकाचा विषय बनत आहे. 20 जानेवारीपासून चीनने ही उपाययोजना सुरू केली.