वॉशिंग्टन : कोरोना विषाणू साथीच्या विनाशकारी परिणामांना सामोऱ्या जाणाऱ्या जगाने मंदीमध्ये प्रवेश केला आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. मंदीतून जग पुढील वर्षी बाहेर पडू शकेल, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जार्जिएव्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, २०२० आणि २०२१ या वर्षांच्या अंदाजाचा आम्ही फेरआढावा घेतला आहे. आपण मंदीत प्रवेश केला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २००९ च्या मंदीपेक्षा ही मंदी अधिक वाईट असणार आहे. २०२१ मध्ये आपण मंदीमधून सावरू शकू.
नाणेनिधीच्या प्रशासकीय मंडळाच्या म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय मौद्रिक व वित्तीय समिती’च्या बैठकीनंतर जॉर्जिएव्हा यांनी ही माहिती दिली. १८९ सदस्यीय समितीने कोविड-१९ने जगासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचा आढावा घेतला.
अमेरिकेलाही झळ
एका प्रश्नाच्या उत्तरात जॉर्जिएव्हा यांनी म्हटले की, जगातील इतर अतिविकसित अर्थव्यवस्थांप्रमाणे अमेरिकेनेही मंदीत प्रवेश केला आहे. विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थाही मंदीत आल्या आहेत. ही मंदी किती गंभीर आहे, याचा आम्ही २०२० या वर्षाच्या अनुषंगाने अभ्यास करीत आहोत. आगामी काही आठवड्यांत नवीन अंदाज जारी केला जाईल.