मंचर -आंबेगाव तालुक्यातील 103 गावांमध्ये पुणे, मुंबई आणि इतर गावांवरून आलेल्या नागरिकांची यादी तयार झाली असून त्यामध्ये सर्वेक्षणानुसार 20 हजार 164 जणांवर शिक्के मारले आहेत. त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. त्यांना घराबाहेर पडू नका अशा सक्त सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाशी संपर्क साधून आहेत. त्यांच्या आदेशानुसार भीमाशंकर हॉस्पिटल, पर्यटन भक्त निवास, अभियांत्रिकी शासकीय आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय, वसतिगृह, सर्व आदिवासी आश्रमशाळांचे व समाजकल्याण खात्याची वसतिगृहे, मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये एकूण 4 हजार 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्यांना घरी राहणे शक्य नाही, अशा व्यक्तींसाठी ही व्यवस्था आहे, असे पठारे यांनी सांगितले. आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. पुणे, मुंबई आणि परराज्यांतून आलेल्या व्यक्तींच्या डाव्या हातावर शिक्के मारले जातात.
संबधित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी गावपातळीवर समिती काम करत आहे. प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे काम प्रभावीपणे सुरू आहे.