तीर्थक्षेत्र आळंदीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे आळंदीत अडकलेले कामगार, प्रवासी, बेघर, रोजंदारीचा अभाव, घरी जाता न आलेले कामगार आणि या परिस्थितीत रोजगार नसल्याने खाण्या पिण्याची तसेच निवा-याची सोय नसल्याने इंद्रायणी नदीचे दुतर्फा फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांनाच अन्नदानाची सोय करण्यासाठी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी पुढाकार घेऊन इंद्रायणी नदी घाटावर व आवश्यक ठिकाणी जाऊन अन्नदान सेवा सुरू केली.
आळंदीत रोजगार बंद झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील झोपडीधारकांना अन्नदान करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, सभापती सागर बोरुंदीया, नगरसेविका सुनीता रंधवे, रुक्मिणी कांबळे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, गणेश रहाणे, मंडलाधिकारी चेतन चासकर, गटनेते पांडुरंग वहिले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आकाश जोशी, कर निरीक्षक रामराव खरात, अधीक्षक किशोर तरकासे, विजय गावडे आदींचे उपस्थितीत व मार्गदर्शनात अन्नदान वाटप करण्यात आले.
आळंदीत कोणी उपाशी पोटी राहू देणार नाही – नगराध्यक्षा उमरगेकर
आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगारास आलेल्या कुटुंबीयांचा रोजगार बंद झाला आहे. यात अनेक सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोटभर जेवणाची व्यवस्था नसल्याने या अन्नदान सेवेने त्यांना पोटभर जेवणाची सोय झाली. यासाठी आळंदी नगरपरिषदेने विशेष पुढाकार घेऊन प्रथम नागरिक नगराध्यक्षा वैजयंता उमगेकर यांचे प्रयत्नातून इंद्रायणी नदी घाटासह आवश्यक त्या ठिकाणी अन्नदान सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी आळंदीकर ग्रामस्थ,व्यापारी,नागरिक व स्वयंसेवी संस्थानी अन्नदान सेवेस हातभार लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
एक हात मदतीचा अन्न साहित्य वस्तू दान मोहिमेस प्रारंभ
या लॉकडाउनची परिस्थिती निवळे पर्यंत आळंदीत अन्नदान सेवा सुरु राहणार आहे. यासाठी स्थानिक नागरिक,व्यापारी,दानशूर व्यक्ती, संस्था यांनी आळंदीतील ज्ञानदर्शन धर्मशाळा भैरवनाथ चौक येथे किराणा साहित्य अन्नदानासाठी वस्तुरूपी मदत व सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे. आळंदी शहर आणि परिसरात उपाशी पोटी कोणीही राहू नये यासाठी आळंदीत एक हात मदतीचा मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्वानी आपले योगदान देऊन कोरोना या संकटावर मात करून गोरगरिबांची अन्नदान रूपातून सेवा करण्यास नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आवाहन केले आहे. आळंदीत कोणी उपाशी पोटी राहू देणार नाही सर्व गरजूना अन्नदान सेवेचा लाभ दिला जाईल असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.