कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडावून करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन जनतेच्या हितासाठीच असले तरीही याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कळंब तालुक्यातील वाकडी (केज) येथील सुमारे दीडशे एकरवरील टरबूज सध्या सडू लागले असून, या बागेची अवस्था बघून शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत.
कळंब तालुक्यातील वाकडी (केज) हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. वाकडी हे गाव भाजीपाला तसेच विविध फळांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सध्याही या गावात मोठ्या क्षेत्रावर विविध फळासह भाजीपाला लागवड करण्यात आलेली आहे. सध्या जवळपास 80 एकरवर टरबुज लावण्यात आले आहे. हे 80 ते 90 दिवसाये पीक असते, आधुनिक पद्धतीने मलचिंग टाकून महागडी औषधे फवारून या बागा शेतकऱ्यांनी फुलविल्या. परंतु कोरोनो व्हायरसच्या विळख्यात लॉकडाउन बरोबर बागाही लॉकडाउन झाल्या अन व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. मार्केट बंद असल्याने बागेत टरबूज सडु लागले आहेत. टरबुज जोपासण्याठी एकरी एक लाख रुपये खर्च येतो तर अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळते. परंतु सध्या शेतकऱ्यांनी उभी बाग शेतात सडतेय हे पाहुन धीर सोडला आहे.