क्वालालंपूर: करोनाच्या संसर्गापासून जगातील जवळपास तीन अब्ज लोक लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. महासाथीच्या आजारात जगभरात कंडोमची मागणी वाढली आहे. मात्र, मागणीचा पुरवठा घटला असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले आहे. या तुटवड्यामागे करोनाचा संसर्ग कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
जगात कंडोमचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये मलेशियाचे ही स्थान आहे. जगातील दर पाचव्या कंडोमपैकी एक कंडोम हा मलेशियातील कॅरेक्स बीएचडी कंपनीचा आहे. मात्र, मागील दहा दिवसांपासून मलेशियातील तीन फॅक्टरीजमध्ये एकाही कंडोमचे उत्पादन झाले नाही. ‘डेलीमेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियातही करोनाच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या फॅक्टरीजचे कामकाज बंद आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सुमारे १० कोटी कंडोमचा पुरवठा कमी झाला आहे.
कॅरेक्सचे सीईओ गोह मिया काइट यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत कंडोमचा तुटवडा जाणवणार आहे. येणाऱ्या काही आठवड्यांसाठी किंवा महिनाभरासाठी कंडोमचा तुटवडा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाचा संसर्ग मलेशियातही पसरला आहे. मलेशियात २१६१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियात १४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. चीनमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे कंडोमचे उत्पादन होते. चीनमध्ये करोनाच्या संसर्गावर नुकतेच नियंत्रण मिळवले आहे. करोनाच्या थैमानामुळे चीनमधील उत्पादनावर परिणाम झाला आहे. चीनमधील जनजीवन अजूनही पूर्वपदावर आले नाही. त्याशिवाय भारत आणि थायलंडमध्ये कंडोमचे उत्पादन होते. मात्र, भारतातही करोनाचा संसर्ग फैलावला असून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. करोनाच्या या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा फटका कंडोमच्या उत्पादनाला बसला आहे.