नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव, त्यातून लादण्यात आलेली बंधने, जगाची अर्थव्यवस्था असे अनेक प्रश्न एकीकडे अन् पती-पत्नीचा वाद काही कमी होत नाही. एखादी गंभीर आपत्तीसुद्धा कौटुंबिक वादाला रोखण्यास हतबल ठरते, याची प्रचिती आज निर्भया पथकाला आली. पती पत्नीच्या वादानंतर रागवलेल्या महिलेने थेट घर सोडून ठक्कर बाजार गाठले. पोलिसांनी पतीला समज देऊन प्रकारणावर पडदा पाडला.
सदर महिला वडाळा नाका भागात आपल्या पतीसह राहते. शनिवारी सकाळी पती पत्नीत वादाचा प्रसंग उद्भवला. चिडलेल्या महिलेने पतीला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच न थांबता ही महिला घरातून एकटीच बाहेर पडली. रागाच्या भरात चालत ही महिला थेट ठक्कर बाजार येथे पोहचली. अर्थात बस सेवा बंद असल्याने तसेच प्रवाशांची वर्दळ नसल्याने या महिलेची उपस्थिती खटकणारी होती. याचवेळी गस्तीवर आलेल्या सरकारवाडा पोलिसांच्या पथकाला ही महिला उद्विगन अवस्थेत दिसली. या पथकाने लागलीच निर्भया पथकाच्या युनिट दोनला माहिती दिली. युनिटच्या पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेकडे चौकशी केली. त्यात पती पत्नीच्या वादाची माहिती समोर आली. निर्भया पथकाने लागलीच महिलेच्या पतीस संपर्क केला. पती पत्नीला समोरासमोर बसवून या पथकाने दोघांमधील वादावर पडदा टाकला.

अधिक वाचा  वनराज आंदेकर हत्या प्रत्यक्षदर्शी ‘साक्षीदार’च्या जीवाला धोका; पोलिसांचे वकिलांच्या मागणीनुसार ‘संरक्षण’ लागू