पुणे: करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या आणि सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसलेल्या संशयित तसेच ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपैकी ५४८ जणांच्या घशातील द्रवाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. त्यामुळे ५४८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आजमितीला ६०३ पैकी केवळ ५५ रुग्ण रुग्णालयात आहेत. २८ जणांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’कडून (एनआयव्ही) येणे बाकी आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने पुण्यातील रुग्णांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. रुग्णांमध्ये किती रुग्ण रुग्णालयात आहेत, किती जणांचे नमुने प्रलंबित आहे किंवा किती रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे याचा लेखाजोखा मांडण्यात येतो. त्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. शहरातील नायडू संसर्गजन्य रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात या रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
आजमितीला तीनही रुग्णालयात एकूण ६०३ जणांना दाखल करण्यात आले आहे. पैकी नायडू रुग्णालयात ४६६ आणि वायसीएम रुग्णालयात १२१ तसेच औंध रुग्णालयात १६ रुग्णांना ठेवण्यात आले. त्यातील एकूण ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. उर्वरित ५५ रुग्ण रुग्णालयात असून, त्यात नायडू रुग्णालयातील ३४ जण आहेत. ‘वायसीएम’मध्ये २१ आणि औंध रुग्णालयात १६ जण आहेत. १४ दिवसांसाठी ११७ प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आजमितीला २ हजार ३९३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८२१ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.

दाखल रुग्णांचा तपशील
रुग्णालयाचे नाव संख्या
नायडू रुग्णालय ४६६
वायसीएम १२१
औंध १६

अधिक वाचा  काँग्रेसमध्ये हालचालींना वेग , बड्या नेत्यांना तातडीने बोलवले नागपुरात