नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करासाठी संरक्षण उत्पादनं बनवण्याचं काम बंद करण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, संप सोडून इतर कोणत्याही परिस्थितीत ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी’चं काम बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आत्तापर्यंत ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डानं ५०-५० टक्के कर्मचाऱ्यांना रोस्टरनुसार आलटून-पालटून वेगवेगळ्या आठवड्यांत काम करण्याचे निर्देश दिले होते.
जबलपूरमध्ये करोना व्हायरसबाधित चार व्यक्ती आढळल्यानंतर सर्व ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या व्यवस्थापकांकडून फॅक्टरी बोर्डाचं मत विचारण्यात आलं होतं. फॅक्टरी पूर्णत: बंद ठेवावी की मागच्या निर्णयानुसार ५० टक्के कर्मचाऱ्यांद्वारे या आठवड्यात आणि ५० टक्के कर्मचाऱ्यांद्वारे दुसऱ्या आठवड्यात उत्पादन कार्य सुरू ठेवायचं आहे? अशी विचारणा बोर्डाकडे करण्यात आली होती.
परंतु, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात निर्माण झालेली गंभीर स्थिती लक्षात घेता जबलपूरमध्ये सर्व निर्माण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गन कॅरेज फॅक्टरीशिवाय ग्रे आयर्न फाऊन्ड्री आणि व्हेईकल फॅक्टरी व्यवस्थापनाकडून २३ मार्चपासून २६ मार्चपर्यंत उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा राष्ट्रवादीचे खटके सुरूच; महायुतीत एकत्र सत्ता तरीही थेट नामफलकालाच काळे फासून आंदोलन