विदेशातून आलेल्या आणि १४ दिवस घरातच राहण्याचे निर्देश दिलेल्या नागरिकांना शोधण्याचे कामही पोलिसांवर येऊन पडले आहे. अशा विदेशी प्रवाशांची यादी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आली असून त्यातील पत्त्यावर जाऊन पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. घराबाहेर पडणाऱ्यांची धरपकड करून त्यांची रुग्णालयात रवानगी करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या शोध मोहिमेसाठी पोलिसांची १३ पथके तयार करण्यात आली आहेत.
विदेशातून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी केली जात आहे. अनेक प्रवाशांमध्ये करोना संसर्गाची लक्षणे दिसली नसली तरी त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना १४ दिवस घरात राहण्याची सक्ती केली जात आहे. असे असूनही अनेक जण रेल्वेने, बसने शहरातच नव्हे तर गावाकडे जाताना आढळत आहेत. हे प्रवासी अन्य कुणाच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने त्यांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. मात्र हातावर विलगीकरणाचा शिक्का मारण्यात आलेले बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी पोलिस आणि महापालिकेकडे येऊ लागल्या. अखेर अशा प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात आली. ही यादी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आली असून अशा लोकांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. विलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती घरात न सापडल्यास त्याचा शोध घेऊन पोलिस त्याची रवानगी रुग्णालयात करीत आहेत. जनता कर्फ्यूसाठीचा बंदोबस्त आणि त्यात या लोकांना शोधावे लागत असल्याने पोलिस यंत्रणेवर ताण पडला आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या कुटुंबीयांकडूनही म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने कायद्याचा धाक दाखवावा लागत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
लॉजचीही तपासणी
विदेशातून आलेले अनेक जण मुंबईतील हॉटेल आणि लॉजमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल आणि लॉज यांचीही तपासणी सुरू केली आहे. हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्यांची नावे, ते कुठून आले आहेत आदी बाबींची नोंद ठेवली जात आहे. १४ दिवस विलगीकरणाची सक्ती केलेल्यांपैकी कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

अधिक वाचा  मविआला मोठा धक्का! अजितदादांच्या करामती; महायुतीने मविआची मतं पळवली