छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करुन त्याच्या तोंडाला काळं फासल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी केलेल्या या कृत्याचे भाजपाचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केलं आहे. यासंदर्भातील एक पोस्टच त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.
भाजपाचे खासदार असणाऱ्या संभाजीराजे यांनी शुक्रवारी दुपारी ‘फुल्ल सपोर्ट’ या नावाने एक पोस्ट शेअर करत शिवसैनिकांचे कौतुक केलं आहे. “विमानातून बाहेर आलो आणि मोबाईल मध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही,” असं संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही पुढे त्यांनी या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता असंही म्हटलं आहे. “मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन,” अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी शिवसैनिकांचे कौतुक केलं आहे.
काय आहे प्रकरण?
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जितेंद्र राऊत नावाचा इसम मागील काही दिवसांपासून आक्षेपार्ह पोस्ट करत होता. चंद्रपूरमधील या इसमाला शिवसैनिकांनी मारहाण केली. तोंडाला काळं फासून, गळ्याच चपलांचा हार घालून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. चिमूर येथील पेंढरी-कोकेवाडा येथे राहणारा जितेंद्र मागील काही दिवसांपासून सतत शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि एकेरी उल्लेख असलेल्या पोस्ट करत होता. या पोस्टचे स्क्रीनशॉर्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते.
हे प्रकरण लक्षात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी आणि पोलिसांनी यासंदर्भात जितेंद्रला समज दिली. या व्यक्तीला समज देण्यासंदर्भातील निवेदनही सह्याद्री प्रतिष्ठानने पोलिसांना दिले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी या व्यक्तीला पोलीस स्थानकात बोलवून घेत समज दिली होती. मात्र त्यानंतर ही व्यक्ती महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करतच होती. अखेर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गोऱ्हे यांच्यासोबत काही शिवसैनिकांनी पेंढरी-कोकेवाडा गावात जाऊन जितेंद्रला बेदम मारहाण केली. त्याच्या चेहऱ्याला काळं फासलं. त्याची धिंड काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या इसमाकडून रितसर माफीनामा लिहून घेण्यात आल्याचे समजते. या व्यक्तीविरोधात शिवसैनिकांनी सिंदेवाही पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेल्या शिवसैनिकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा  पुण्याचा कारभारी कोण ? मुरलीधर मोहोळांनी हा खुलासा पण विभिन्न विषयांवर ती भाष्य करत दावाही केला कायम