मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे. रविवारी राज्यात 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील 4, मुंबईचे 5 तर नवी मुंबई येथील 1 रुग्ण आहेत. राज्यातील बाधितांची संख्या आता 74 झाली होती. आता ती संख्या वाढून 89वर गेली आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला.
हा राज्यातील दुसरा बळी होता. दोन दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते आहे. हे थांबवायचे असेल तर सरकारच्या सूचनांचे पालन करा. यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देताना अत्यावश्यक सेवा देणा-या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जनतेने आतापर्यंत जी जिद्द व संयम दाखविला तो पुढील काळातही चालू ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
रविवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू केले आहे. यामुळे एक प्रकारे शहरी भाग ‘लॉक डाऊन’ करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात रेल्वे, खासगी बसेस, एस.टी. बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा चालविली जाणार आहे. सरकारी कार्यालयांतील उपस्थितीसुद्धा अवघ्या पाच टक्क्यांवर आणण्यात आली असून केवळ अन्नधान्य, भाजीपाला, औषधे दुकानेच सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन; रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राणज्योत मालवली