सिंधुदुर्ग: ‘सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडं येण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांनी मुंबईतच राहावं, अशी विनंती कणकवलीचे भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केलं आहे. ‘मुंबईतून लोक गावी आल्यामुळं गावांमध्ये करोना व्हायरस पसरू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसह देशभरात सध्या करोना विषाणूनं धुमाकूळ घातला आहे. मुंबईत हा विषाणू झपाट्यानं पसरत असून त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळं व नववी व अकरावीच्या परीक्षा पुढं ढकलल्यानं शाळा बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं चाकरमानी आपापल्या गावांकडं जायला निघाले आहेत. मात्र, त्यामुळं गावाकडच्या लोकांना चिंतेनं ग्रासलं आहे. तीच चिंता नीतेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.
‘सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरीच राहावे, कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे! ही वेळ सुट्टीची नाही. आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची आहे,’ असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, करोना व्हायरसमुळं राज्यात निर्माण झालेलं संकट अधिक गहिरं होताना दिसत आहे. राज्यातील करोना रुग्णांचा कालपर्यंत ५२ असलेला आकडा आज थेट ११ ने वाढून ६३ वर पोहोचला आहे. यात मुंबईतील दहा तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

अधिक वाचा  काटोलमधून अनिल देशमुखांपुढे तगडं आव्हान, श्रीकांत जिचकरांचे पुत्र याज्ञवल्क्यने ठोकला शड्डू!