जयपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये ३१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. तसे आदेशच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेत. त्यामुळे, संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारं पहिलं राज्य ठरलंय. या लॉकडाऊन दरम्यान, भाज्या, दूध यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींसोबत मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. याशिवाय कोणतेही दुकान सुरू राहणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलंय. यापूर्वी काही राज्यांनी काही शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. परंतु, राजस्थानमध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
राजस्थानात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. हेच ध्यानात घेता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री ही घोषणा केली. उच्च अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतल्यानंतर गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केलाय. लॉकडाऊन दरम्यान सर्व सरकारी कार्यालय, मॉल, फॅक्टरी, सार्वजनिक वाहतूक सेवा इत्यादी बंद राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
राजस्थानात ३३ करोना रुग्ण
राजस्थानात शनिवारी करोनाबाधित नवीन ८ रुग्ण आढळले. संक्रमित नागरिकांमध्ये ५ जण भीलवाडा तर १ जण जयपूरमध्ये आढळलाय. यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३३ वर पोहचली आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, भीलवाडामध्ये शुक्रवारी ६ नवीन रुग्ण आढळले आणि शनिवारी आणखी ५ रुग्ण सापडले. त्यामुळे एकट्या भीलवाडातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ११ वर गेलीय. यातील ९ जण भीलवाडाच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर दोघांवर जयपूर स्थित एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉक्टरसहीत रुग्णालयाचे कर्मचारीही करोनाबाधित
अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीलवाडामध्ये आढळलेल्या सर्व पाच नव्या संक्रमित लोक त्याच रुग्णालयाचे कर्मचारी आहेत जिथं शुक्रवारी एक डॉक्टर करोनाबाधित आढळला होता. या रुग्णालयात २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांची सर्वांची चाचणी सुरू आहे.

अधिक वाचा  कोणालाही समर्थन द्या, तरीही पंतप्रधान मोदींना मते ; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास