नागपूर: करोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आल्याने संबंधित महिलेवर तीन दिवस अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. हा धक्कादायक प्रकार नागपुरात घडला. या महिलेवर आज अत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
नागपूरजवळच्या लोणारा भागातील ही घटना आहे. एका ५२ वर्षीय महिलेच्या मृत्यूबाबत अफवा पसरवण्यात आल्याने पुढील सारा प्रकार घडला. या महिलेचा मृतदेह तीन दिवस अंत्यसंस्काराविना पडून होता. पोलिसांनी ग्रामसभा घेऊन गावातील नागरिकांची समजूत घातली आणि त्यानंतर काल शुक्रवारी या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती आता पुढे आली आहे.
१७ मार्चला संबंधित महिलेचा कोल्ड अटॅकमुळे मृत्यू झाला. त्यांचा मुलगा फ्रान्समध्ये वास्तव्यास असतो. आईच्या मृत्यूबाबत कळताच मुलगा पॅरिसहून नागपुरात अंत्यसंस्कारासाठी आला. पण, त्याला विमानतळावरून थेट आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात नेऊन ठेवण्यात आले. दरम्यान, त्याच्या आईचा मृत्यू करोनामुळे झाला अशी अफवा गावात पसरवली. त्यामुळे ग्रामस्थानी अंत्यसंस्कारास मनाई केली. या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास गावकरी तयार नसल्याची माहिती मिळताच शेवटी पोलिसांनी पुढाकार घेतला. गावच्या ग्रामपंचायतीची सभा घेण्यात आली व हा मृत्यू करोनामुळे झालेला नसल्याचे पटवून देण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाशी पत्र व्यवहार करून मुलाला अंत्यसंस्कारासाठी बोलवून घेण्यात आले व शुक्रवारी दुपारी ३ वाजता लोणारा घाटावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिक वाचा  विधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार