लंडन: एखाद्या संशयिताला करोनाची लागण आहे की नाही याचे निदान अवघ्या ३० मिनिटात करणे शक्य होणार आहे. रॅपिड टेस्टिंग टेक्नॉलॉजी तयार करण्यात आली असून यामुळे आता करोनाबाधितांवर त्वरीत उपचार करता येणार आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या करोनाचे निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचणीत किमान दोन तासानंतर वैद्यकीय अहवाल येत होता. आता या ऑक्सफोर्डच्या नव्या संशोधनानुसार अवघे ३० मिनिटे लागणार आहेत. याचा फायदा ग्रामीण, दुर्मिळ भागातील वैद्यकीय पथकांना होणार आहे.
या नव्या वैद्यकीय चाचणीसाठी हिट ब्लॉकची आवश्यकता असणार असल्याचे संशोधकांनी सांगितले. आरएनए रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आणि डीएनए एम्प्लिफिकेशनसाठी स्थिर तापमान राखण्यासाठी हे हिट ब्लॉक कार्यरत असते. त्याशिवाय इतर कोणत्याही मोठ्या उपकरणांची आवश्यकता नसल्याचे संशोधकांनी सांगितले. या नव्या वैद्यकीय चाचणीला ब्रिटनमध्ये मान्यता मिळाली आहे. इतर देशातही मान्यता मिळाल्यास करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  बुलडाण्यामध्ये खळबळजनक घटना; अधिकाऱ्यासमोरच महिलेचे थेट हातावर ब्लेडने सपासप वार असं काय घडलं?