देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना मुंबई, पुणे आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मराठी कलाकारही या अभियानासाठी पुढे सरसावले आहेत.
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, सर्व लोकांना जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. करोनाच्या संकटाकडे सर्वांनी गंभीरपणे पहायला हवं. मिळालेल्या सुट्टीचा परिवारासोबत वेळ घालवत सदुपयोग करा. प्रशासकीय यंत्रणा आपल्यासाठी बाहेर झटत आहेत, त्यांना घरी राहण्याची मुभा नाहीये….अशा शब्दांमध्ये स्पृहाने जनतेला आवाहन केलं आहे.
दरम्यान, आजच्या दिवशी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून सर्व महत्वाची शहरं ही बंद राहणार आहे. अत्यंत गरजेचं असल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात करोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणा यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  ‘देशातील आत्तापर्यंतच सर्वांत मोठं सर्वेक्षण’; आयोगाचे अध्यक्ष काय म्हणाले वाचा सविस्तर