गेला महिनाभर सर्वसामान्य माणसाचे जीवन क रो ना या तीन अक्षरांभोवती फिरत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमधील संदेश, बातम्यांचे मथळे, मिम्स, विनोद याची जागा करोनाने घेतली आहे. खोकला आणि सर्दीतून प्रादुर्भाव होणाऱ्या करोनानामक विषाणूने जगभरात नऊ हजाराहून जास्त नागरिकांचे प्राण घेतले असून देशातही दोनशे रुग्ण करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने ३१ मार्चपर्यंत नाटय़ आणि चित्रपटगृहे तर चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. करोनामुळे अचानक दहा पंधरा दिवस मिळालेल्या या सुट्टीत कलाकार घरी राहत आपला वेळ सत्कारणी लावत आहेत. कोणी वाचन, लेखन, चित्रकला यासारखे आवडीचे छंद जोपासत आहेत, तर कोणी वेळेचा सदुपयोग घरच्यांसोबत तसेच राहिलेले काम पूर्ण करण्यासाठीही करत आहे. या फावल्या वेळेत हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका काय काम करतात यावर टाकलेली एक नजर..
मनसोक्त झोपा काढतो
करोनामुळे चित्रीकरण ठप्प झाल्याने चांगल्या गोष्टी करण्यात वेळ सत्कारणी लावत आहे. या अचानक मिळालेल्या सुट्टीत मी मनसोक्त झोप काढत आहे. रोजच्या धावपळीमध्ये काही कारणास्तव झोप पूर्ण होत नाही. ते झोपण्याचे काम मी आता पूर्ण करत आहे. या दिवसात मी वेगवेगळ्या गोष्टी करत असून कथा वाचत आहे. नुकतेच बायकोसोबत जाऊन घरातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून आलो. मुलीसोबत खेळत आहे. माधव खैरनार लिखित ‘शोध’ नावाची कादंबरी वाचण्यात माझा दिवस चांगला गेला. नीरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल ऑप्स’ आणि अर्शद वारसीची प्रमुख भूमिका असलेली ‘असुर’ या दोन वेब सीरिज पाहत आहे. वेगळा विषय आणि कलाकारांचा अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या जरूर पाहाव्यात. या काळात करोनाविषयीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बातम्या पाहतो. या निमित्ताने प्रेक्षकांना घरी राहण्याचे आवाहन करतो. शक्यतो बाहेर पडू नका आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील तथाकथित करोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.
सिद्धार्थ जाधव, अभिनेता

अधिक वाचा  महाराष्ट्राला वेध विधानसभा निवडणुकीचे! निवडणूक आयोगाची तयारीची तारीख जाहीर

समाजमाध्यमांपासून चार हात लांबच
करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जाणारे संदेश मी दुसऱ्यांना पाठवत नाही. रोज व्हिडीयो पाहते आणि पोस्ट वाचते, परंतु माहितीची शहानिशा केल्याशिवाय पुढे पाठवत नाही. सध्या तीन-चार दिवस मी टीव्ही आणि बातम्या पाहत नाही. एखाद्या गोष्टीविषयी माहिती जाणून घ्यायची असल्यास ऑनलाइन लेख, बातम्या वाचते. या दिवसांत मी समाजमाध्यमांपासून जरा चार हात लांबच आहे. मालिकेच्या व्यस्त दिनक्रमात खूप कमी वेळा स्वत: स्वयंपाक केला जातो. त्यामुळे सध्या मी स्वत:च्या हाताने जेवण बनवत आहे. गेले तीन चार दिवस मोलकरीण येत नसल्याने घरातील कामे स्वत:च करत आहे. या दिवसात मी माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देत आहे. त्यांच्याशी राजकीय, कला, सांस्कृतिक, आर्थिक अशा गोष्टींवर गप्पा मारते. रोज सकाळी फिरायला जात आहे. याबरोबर ‘ताजमहाल’ ही वेब सीरिज पाहत आहे. काही कथा, कादंबऱ्या, लेख वाचायचे राहिल्याने ते पूर्ण करत आहे. या वर्षांत फिरायला जायचे असल्याने विविध लोकांनी लिहिलेले पर्यटनासंबंधित व्हिडीयो, ब्लॉग पाहत आहे.
अनिता दाते, अभिनेत्री

जिमशिवाय व्यायामाला प्राधान्य
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिके चे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवस घरीच आहे. या कालावधीत फिटनेसकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या जिम बंद असले तरीही माझ्या व्यायामात फारसा फरक पडला नाही. मी आणि प्रशिक्षक संजीव चांदोरकर जिमशिवायच व्यायाम करत आहोत. जोर-बैठका, पुशअप्स असा घरच्या घरीच व्यायाम करत आहे. याचबरोबर हाताच्या व्यायामाचा समावेश असलेल्या ‘बर्पीज’ या व्यायाम प्रकाराचीही जोड देण्यात आली आहे. या सर्व व्यायाम प्रकारामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.
अभिजीत खांडकेकर

मास्क घालून चालणे..
मालिकेचे चित्रीकरण बंद असल्याने मी घरीच आराम करत आहे. जिम बंद असल्याने सकाळी न चुकता व्यायामही करत आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सध्या सूर्यनमस्कार घालते. याचबरोबर पारंपरिक व्यायाम प्रकारही करत आहे. रोजचं चालणं आणि धावणं देखील सुरूच आहे. मी बाहेर जाताना चेहऱ्यावर मास्क लावायला विसरत नाही. चालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळते. जिथे फार गर्दी नाही, माणसांची वर्दळ नाही अशा ठिकाणी मी जाण्यास प्राधान्य देते.
तेजश्री प्रधान

अधिक वाचा  सगे-सोयरेच्या द्वारे आरक्षण संपवण्याचा डाव; अधिसूचना रद्द करण्यासाठी ओबीसी नेते ॲड.मंगेश ससाणेंचे उपोषण

घरकाम, भाडिपाचे नवीन प्रोजेक्ट
सध्या करोनामुळे घरी असल्याने भांडी घासणे, आवडीचे पदार्थ करून खाणे, नवीन कल्पनांवर काम करणे ही कामे सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव भाडिपाच्या टीमलाही सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत मी भाडिपाच्या व्हिडीयोचे दिग्दर्शन केले नव्हते. सहकाऱ्यांकडून विषयाची मांडणी, संकलन करून घेतले जात होते. यानिमित्ताने स्वत: व्हिडीयो तयार करण्यास सुरुवात केली आहे. भाडिपाचा ‘पांडू’ हा व्हिडीयो प्रदर्शित झाल्यावर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हिंदीप्रमाणेच मराठीतही ‘समांतर’, ‘काळे धंदे’ यासारख्या वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. लवकरच असा जास्त लांबीचा कंटेट करण्याचा प्रयत्न सुरू असून प्राथमिक नियोजन सुरू आहे. भाडिपासाठी लेखक, दिग्दर्शक, डिझायनर यांच्यासोबतच्या मीटिंग गुगल हँगआऊटवर घेतल्या जात आहेत. दिवसातील अर्धा वेळ गुगल हँगआऊटवर मीटिंग करण्यात जात आहे.
सारंग साठय़े, भाडिपा

कलाकारांचा गृहपाठ
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही ही मिळालेली सुट्टी सत्कारणी लावताना दिसत आहेत. करोनाच्या निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा उपयोग चित्रे काढणे, व्यायाम, वाचन, चित्रपट, वेब सीरिज पाहणे यासाठी करताना दिसत आहे. समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपण करत असलेल्या गोष्टींची माहिती चाहत्यांना देत आहेत.
* नवाब सैफ अली खान घरी बसून तैमूर आणि करिनासोबत वेळ घालवत आहे. त्याचबरोबर तो घरी वाचन, खाद्यपदार्थही बनवत आहे.
* टेनिसपटू महेश भूपती आणि पत्नी लारा दत्ता मुलीसोबत विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. घरी कागदांच्या साहाय्याने सौर ऊर्जेचे मॉडेल तयार करत आहेत. तर तिची मुलगी सारा आई-वडिलांसोबत पुस्तक वाचत आहे. कधीही स्वयंपाकाला हात न लावलेली लारा दत्ता आता यू-टय़ुब आणि पुस्तकातून शोधून रोज एक नवीन खाद्यपदार्थ तयार करत आहे. करोनामुळे मला स्वयंपाक शिकायला मिळाल्याचे मत तिने व्यक्त केले.
* आपली छपाक गर्ल तापसी पन्नू चित्रपटांच्या कथा वाचत असून अर्धवट राहिलेले चित्रपटही पाहत आहे. करोनामुळे लग्न लांबणीवर टाकलेली अभिनेत्री रिचा चढ्ढा घरच्या घरी बागकामाचे ऑनलाइन धडे घेत आहे. तसेच ती नृत्यही शिकत आहे.
* अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी ऑस्कर विजेते चित्रपट पाहत आहे. तसेच दिग्दर्शक शकुन बात्राच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे.
* लंडनहून भारतात परतलेल्या सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी घरात स्वत:ला बंद करून घेतले असून या काळात ती जेवण बनवत असून नवऱ्याची काळजी घेण्यात व्यस्त आहे.
* दीपिका पादुकोन ही घरातला वेळ कपाट आवरण्यात घालवत आहे.
* प्रियांका चोप्रा घरात आपल्या कुत्र्यासोबत वेळ व्यतीत करत आहे.
* कॅटरिना कैफ गिटार वाजवण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
* अनेक दिवसांनंतर अनन्या, जान्हवी आणि खुशी या कपूर बहिणी मजामस्ती करत आहेत.
* सनी लियोन आणि पती डॅनियल वेबर हे मुलीसोबत चित्रे काढण्यात व्यस्त आहेत.
घरी बसल्या बसल्या काय पाहाल?
* ऑस्कर विजेते चित्रपट
* स्पेशल ऑप्स – दिग्दर्शक नीरज पांडे – अ‍ॅमेझॉन प्राईम
* असुर – अर्शद वारसी आणि वरुण सोबती – वूट
* समांतर – अभिनेता स्वप्निल जोशी – मॅक्स प्लेयर
* मेंटलहूड – करिश्मा कपूर – झी ५
* देवी – अभिनेत्री काजल, मुक्ता बर्वे – यू-टय़ूब
* शी – दिग्दर्शक इम्तियाज अली – नेटफ्लिक्स
* गिल्टी – कियारा अडवाणी – नेटफ्लिक्स