करोना विषाणुची प्रादुर्भाव रोखण्यासाठी हवेत औषध फवारणी करण्यात येणार आहे… असा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नावे संदेश व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयंवत पोवार यांनी याप्रकरणी सायबर सेलमध्ये आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
‘करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारी रात्री सात वाजल्यानंतर हवेत औषध फवारणी करण्यात येणार आहे. तरी शहरवासियांनी रात्री सात ते पहाटे सहा वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये,’ असे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या नावे आवाहन करणारा संदेश शुक्रवारी सकाळपासून विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल झाला होता. असा संदेश सर्वत्र पसरल्यानंतर अनेकांनी याची खातरजमा महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांकडे मोबाइलद्वारे संपर्क साधला. काही नागरिकांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना याबाबत विचारणा केली.
मात्र अशा कोणताही संदेश महापालिकेने प्रसारित केला नसल्याचे सांगत दिवसभर नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. हा अत्यंत चुकीचा संदेश पसरत असल्याने शुक्रवारी रात्री आरोग्य विभागाने पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरू होती. मात्र या संदेशामध्ये आयुक्त म्हणून कोणत्याच व्यक्तीचा उल्लेख नसल्याने नेमका कोणत्या आयुक्तांनी संदेश दिला याची माहिती स्पष्ट होती नव्हती. त्यामुळे तक्रार देण्यात आली नाही. मात्र, शनिवारी सकाळपासून पुन्हा चौकशी सुरू झाल्याने शेवटी तक्रार दाखल करण्याचा निर्यण घेण्यात आला. त्यानुसार सकाळी मुख्य आरोग्य निरीक्षक पोवार यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली. सेलने अज्ञात व्यक्तींविरोधात चुकीचा संदेश पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अधिक वाचा  पुण्यासाठी मोदी सरकारचा निधीचा ओघ यंदाही ६९० कोटी निधीमुळे शहर प्रदूषणाला आळा: मुरलीधर मोहोळ