पुणे : सराफ व्यावसायिकाला 50 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पै. मंगलदास बांदल यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विभागाने ही कारवाई केली आहे. फिर्यादीला व्हिडीओ क्लिपिंग दाखवून खंडणीसाठी ब्लॅकमेल करणे, असा आरोपही मंगलदास बांदल यांच्यावर आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना अखेर शनिवारी अटक करण्यात आली.
या प्रकणात आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना यापूर्वी खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणात गाडगीळ यांच्या कुटुंबातील महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात मंगलदास बांदल यांचं नाव आल्याने राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंगलदास बांदल हे माजी जिल्हापरिषद सदस्य, बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आहे. बांदल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. बांदल हे वादग्रस्त राहिले असून यापूर्वी 2017 मध्ये आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेमुळे छापेमारी केली होती.

अधिक वाचा  मॅग्मा एचडीआयचा – “वनप्रोटेक्ट” आधुनिक वैयक्तिक अपघात विमा