नवी मुंबई : करोनाचा प्रसार टाळता यावा म्हणून नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. असे असताना परदेशातून आलेल्या एका नागरिकाने स्वत:ला अलगीकरण न केल्याने रहिवाशांची पंचाईत झाली होती. रहिवाशांची मागणी मान्य न करीत उलट त्याने पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रारही दिली. अखेर पोलीस व प्रशासनाने त्यांना कायद्याचे ढोस पाजल्यानंतर त्यांनी पुढील काही दिवस घरातच राहणे मान्य केले. त्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
ही घटना कोपरखरणे येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील आहे. या सोसायटीतील एक गृहस्थ सहलीसाठी विदेशात गेले होते. शुक्रवारी ते भारतात परतले. ते विदेशातून आल्याचे समजल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांना भीतीने ग्रासले होते. ते करोना संशयित नसल्याचे त्यांनी सोसायटीतील नागरिकांना सांगितले, मात्र सतर्कता म्हणून आपण १४ दिवस घरातच अलगीकरण करून घ्यावे, अशी विनंती रहिवाशांनी त्यांना केली. मात्र त्यांनी ते मान्य न करीत आपली नियमित कामे सुरू केली. रहिवाशांनी यावर आक्षेप घेतल्याने त्यांनी मला वाळीत टाकले जात असल्याची तक्रार पोलिसांत दिली. या वेळी पोलिसांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यांनी मान्य केले नाही.
आरोग्य विभागाचे पथक व वैद्यकीय अधिकारी वंदना नारायणे आणि पोलीस त्यांच्या घरी गेले. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी या पथकालाच कायद्याचे ढोस पाजले. मात्र त्यानंतर त्यांना अन्यथा सरकारी अलगीकरण केंद्रात घेऊन जावे लागेल, असे सांगितल्यानंतर त्यांनी पुढील १४ दिवस घरातच राहण्याचे मान्य केले.
मी घरात राहिलो तर खाऊ काय?
परदेशातून आल्याने आपण पुढील काही दिवस काळजी म्हणून घराबाहेर पडू नये, अशी भूमिका आरोग्य व पोलीस प्रशासनाने घेतल्यानंतर सदर व्यक्तीने यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान होणार असून मी खाऊ काय? असा सवाल उपस्थित केल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
सोसायटीतील रहिवाशांनी घेतलेली भूमिका ही सर्वाच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे त्यांना समजावून सांगितले. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे सांगितल्यानंतर त्यांनी घरातच राहण्याचे मान्य केले आहे.
– सूर्यकांत जगदाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे
सदर व्यक्ती वा कुटुंबातील सदस्यांना करोना झालेला नाही. मात्र ते विदेशातून आल्याने केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून अलगीकरण आवश्यक आणि अनिवार्य आहे. शेवटी या कुटुंबाने घरातच १४ दिवस राहण्याचे मान्य केले आहे. त्यांनी ते मान्य केले नसते तर कायद्यानुसार जबरदस्तीने पकडून सरकारी अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असते.
– वंदना नारायणे, वैद्यकीय अधिकारी

अधिक वाचा  महाराष्ट्र भाजपात मोठ्या हालचाली, लोकसभेतील पराभवामुळे मोठे फेरबदल?, राष्ट्रीय पातळीवर उचलले असे पाऊल