बीजिंग: करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेक संशोधने करण्यात आली. करोनाचा संभाव्य धोका टाळणे, कोणते उपचार प्रभावी ठरतील आदी विविध कारणांसाठी ही संशोधने पार करण्यात आली. चीनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, विशिष्ट रक्तगट असणाऱ्यांना करोनाच्या संसर्गाचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे.
चीनमधील करोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या वुहान आणि शेन्झेन या प्रातांतील सुमारे २००० करोनाबाधित रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात रुग्णांमध्ये ‘ए’ रक्तगट असणारे रुग्ण सर्वाधिक असल्याचे समोर आले. या ‘ए’ रक्तगटातील रुग्णांमध्ये करोनाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आणि तीव्र लक्षणं आढळून आली. तर दुसऱ्या बाजूला ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचेही या अभ्यासात आढळले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चीनमधील वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे.
ए रक्तगटाच्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. वुहानमध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू २०६ रुग्णांमध्ये ६३ टक्के रुग्ण हे ‘ए’ रक्तगट असलेले होते. तर, ५२ टक्के जणांचा रक्तगट हा ओ हा होता. मृतांमध्ये जवळपास सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुष रुग्ण होते. ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांची अधिक काळजी घ्यायला हवी असे Medrxiv.org मध्ये प्रकाशित झालेल्या वांग शिन्‍जुआन यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे. ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींमध्ये संसर्ग होण्याचा वेग कमी असल्याचे आढळले असल्याचेही त्यांनी म्हटले.
तियानजिमधील शासकीय लॅबोरिटरी ऑफ एक्‍सपेरिमेंटल हेमाटोलॉजीचे संशोधक यिंगदाई यांनी या संशोधनासाठी नमुन्यांची संख्या वाढवल्यास त्याचा निष्कर्ष वेगळा येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली. वेगवेगळ्या रक्तगटांवर करोनाच्या संसर्गाचा नेमका कसा परिणाम होतो यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा  ठाकरे भाजपाला भिडण्यास तयार ‘मविआ’चा मुंबईतील 20-18-7-1 फॉर्म्युला?; माध्यमाकडे संपुर्ण यादीच आली