लुधियाना: पंजाबमधील कोरोनाचे १६७ संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील कोरोना संशयित मोठ्या संख्येने बेपत्ता झाल्यामुळे प्रशासनाचीही झोप उडाली आहे. दरम्यान, आता पर्यंत २९ संशयित बेपत्ता झालेले सापडले असून अद्याप १६७ कोरोना संशयितांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पंजाबमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतीच परदेश दौर्‍यावरुन परत आलेल्या नागरिकांची यादी देण्यात आली होती. त्या यादीनुसार आरोग्य विभाग अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व करोना संशयितांना संसर्ग असल्यास क्वारंटाइन करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न होता. सिव्हिल सर्जन डॉ. राजेशकुमार बग्गा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘परदेशातून येणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे १९९ जणांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२ लोकांचा शोध घेतला आहे. आरोग्य विभागाच्या दुसऱ्या टीमवर ७७ जणांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.’
आरोग्य विभागाच्या पथकाला १७ संशयित आढळले असल्याची माहिती सिव्हील सर्जन सर्जन कुमार यांनी माहिती देताना सांगितले. लुधियानामध्ये उर्वरित १६७ लोक अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत या संशयितांविषयी माहिती न मिळण्याचे एक कारण म्हणजे पासपोर्टमधील चुकीचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक असू शकतो, असेही सर्जन कुमार म्हणाले. या सर्वांचे पत्ते आणि फोन नंबर बदलले आहेत. आमच्या टीम सक्रिय आहेत आणि त्यांचा शोध घेत आहेत, असे सांगत ते लवकरच सापडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, व्हायरसचा धोका लक्षात घेता लुधियाना रेल्वे स्थानकाच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला जात आहे. याआधीही पंजाबमध्ये १४ मार्च रोजी धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानुसार परदेशातून आलेल्या तब्बल ३३५ लोकांचा पत्ताच नसल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये स्पष्ट केले होते. या वृत्तानंतर पंजाबात खळबळ उडाली होती. परदेशातून परत आलेल्या एकूण ३३५ लोकांची स्क्रीनिंग करण्यात आली नसून ते लोक सध्या कुठे आहेत याबाबत काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे पंजाब सरकारने जाहीर केले होते.

अधिक वाचा  विधानसभेच्या निकालात खरंच गोंधळ? निवडणूक आयोगाची माध्यमांकडे सविस्तर उत्तरं…