नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी करोना विषाणू भारतात फैलावत चालल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारनं योग्य वेळी निर्णायक पाऊल उचललं नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या असक्षमतेची मोठी किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. राहुल गांधींच्या या ट्विटला भाजप नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी सोशल मीडियातूनच प्रत्यूत्तर दिलंय.
‘आपलं सरकार निर्णायक रुपात काम करण्यासाठी असक्षम आहे. त्याची भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल. करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी त्वरीत आक्रमक पावलं उचलायला हवीत’ असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्याला प्रत्यूत्तर देताना विप्लब देव यांनी राहुल गांधींना ‘कार्टुन चॅनल पाहणं सोडून न्यूज चॅनल पाहत चला’ असं म्हणत प्रत्यूत्तर दिलं.
‘संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. ऍडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आलीय. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच करोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टुन नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा’ असं विप्लव देव यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांच्या या ट्विटला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनीही प्रत्यूत्तर दिलंय. ‘राहुल गांधी एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांना भारतात करोना रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न दिसत नाहीत. तुमच्याच सहकाऱ्यांना विचारा की भारत सरकार करोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी किती काम करत आहे’ असं रेखा शर्मा यांनी म्हटलंय.
चिदंबरम यांनी केलं होतं कौतुक
करोना रोखण्यासाठी भारत सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी कौतुक केलं होतं. यासोबतच करोना व्हायरसमुळे होणारं आर्थिक नुकसानीच्या समस्येवरील उपायांवरही लक्ष देणं गरजेच आहे. तसंच सर्वात जास्त प्रभावित होणाऱ्या गरीबांच्या मदतीसाठी काही पावलं उचलली जाणं आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.
जगभरातून कौतुक
उल्लेखनीय म्हणजे, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनं आणि अनेक देशांनीही केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांच्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोनाशी निपटण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली होती. त्याशिवाय पंतप्रधानन मोदी करोनाशी दोन हात करण्यासाठी जी २० च्या सदस्य देशांसोबत चर्चा करण्याच्या तयारीत आहे.

अधिक वाचा  पुणेकरांचा आनंद दुहेरी; मोदीजीची तिहेरी शपथ अन् मुरली(अण्णा)ही सोबत