मुंबई – कोरोनाव्हायरसने मुंबईत एका 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. परंतु, त्यांच्या निधनापूर्वी लोकांनी त्यांना कसे अपमानित केले याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. शेजाऱ्यांनी आरोप केला, की त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला तेव्हा लोकांनी त्या वृद्धाला घृणास्पद मेसेज पाठवले. त्यांच्या कुटुंबियांसोबत भेदभाव करण्यात आला. पती-पत्नी आणि त्यांचा मुला 1 मार्चला दुबईहून पुण्याला आले होते. यानंतर ते टॅक्सीने मुंबईत पोहोचले. मुंबईत आल्यानंतर तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि त्यातील वडिलांचा मृत्यू झाला. उर्वरीत रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे केवळ या कुटुंबियांनाच नव्हे, तर सोसायटीत राहणाऱ्यांना सुद्धा लोकांनी अस्पृश्य बनवले आहे.
स्वतःच्या मृत्यूचे मेसेज मिळाले…
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मृत वृद्ध मुंबईतील एका नामांकित सोसायटीमध्ये राहत होते. त्यांना 13 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, रुग्णांचे नातेवाइक, सोसायटीतील इतर लोक आणि ज्या लोकांना ते गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत होते, ते सुद्धा या लोकांना अपमानित करत होते. त्यांच्यापासूनच कोरोनाचा फैलाव होतो असे सांगायचे. मृत्यू होण्याच्या एका दिवसापूर्वी सोशल मीडियावर संबंधित वृद्धाला त्यांच्याच मृत्यूचे मेसेज पाहायला मिळाले. यातून कुटुंबियांना खूप मानसिक त्रास झाला.
शाळेत मुलीसह नातूसोबत भेदभाव
शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे जेव्हा सोसायटीमध्ये कळाले तेव्हा ही बातमी सर्वत्र पसरली. सोसायटीमध्ये दैनंदिन कामासाठी येणाऱ्या घरकाम आणि इतर कामगारांनी येणे बंद केले. अफवा इतकी पसरली की त्या व्यक्तीची मुलगी आणि नातूंसोबत शाळेमध्ये भेदभाव करण्यात आला. कॉलनीत सुद्धा लोक त्यांच्याशी दुजाभाव करत आहेत. हे लोक सोसायटीमध्ये गेल्या 20 वर्षांपासून राहतात. परंतु, लोकांनी कोरोनामुळे त्यांना अवघ्या काही मिनिटांत परके केले.
आसपासच्या 460 घरांमध्ये एकही संक्रमण नाही
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मृताच्या घराच्या जवळपास राहणाऱ्या तब्बल 15 इमारतींमधील 460 घरांत संक्रमणाचा शोध घेतला. परंतु, कुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले नाही. ज्या रुग्णालयात या कुटुंबाला उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथील 8 डॉक्टर, नर्स आणि स्टाफपैकी कुणाचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह नाहीत. तरीही रुग्णालयातील 74 जणांना त्यांच्याच घरात विलगिकृत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अधिक वाचा  सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात, आप आक्रमक; केजरीवाल यांची पोस्ट, राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी तुमचा अहंकार…’