न्यूयॉर्क: एकीकडे संपूर्ण अमेरिकेत करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउन आणि आणीबाणीची परिस्थिती आहे. मात्र, अशा वातावरणातही काही लोक त्यांचा केवळ फायदा पाहत आहेत. अमेरिकेच्या टेन्सीमध्ये एक प्रकरण उघडकीस आले आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन भावांनी सॅनिटायझरच्या तब्बल १८ हजार बॉटल्स खरेदी केल्या. त्यानंतर या बॉटल्स प्रत्येकी पाच हजार रुपयांना विक्री करण्याचा घाट घातला. चढ्या दराने विक्री करताना आढळल्यामुळे या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, टेन्सी येथे राहणारे मॅट आणि नोहा कोल्विन या दोन भावांना सॅनिटायझरचा कृत्रिम साठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एक मार्च रोजी अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर या दोघांनी शहरात असणाऱ्या सर्व सॅनिटायझरच्या बॉटल्स दुकानातून घेण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर या दोघांनी सॅनिटायझरचा साठा करण्यासाठी १३०० मैल प्रवास करत टेन्सी, केंटकी व जवळपासच्या परिसरातील सर्वच दुकानांतून सॅनिटायझर खरेदी करण्यास सुरुवात केली.
जेव्हा शहरात सॅनिटायझरच्या टंचाईची चर्चा सुरू झाल्यानंतर अॅमेझॉनवर विक्री करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आरोपी मॅटने दिली. पहिल्या वेळेस ३०० सॅनिटायझरची विक्री केली. यामध्ये एका सॅनिटायझरची विक्री ही आठ ते ७० डॉलरपर्यंत करण्यात आली. त्यानंतर अॅमेझॉनने या विक्रीची चौकशी सुरू केली. अॅमेझॉनच्या तक्रारीवर या दोघांना अटक करण्यात आली. सॅनिटायझर वेबसाइटवर लिस्टींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अॅमेझॉनने कारवाई केली आहे. तर, इतरांना असे न करण्याबाबत ताकीद दिली. अटक करण्यात आल्यानंतर या दोन्ही भावांनी माफी मागत साठेबाजी केलेले सर्व सॅनिटायझर चर्चला दान करत असल्याचे सांगितले. कठोर शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी दानकर्म केले असल्याची चर्चा आहे. आपण गरीब आहोत आणि गरीबीतून बाहेर पडण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याची कबूली मॅटने चौकशीदरम्यान दिली. अॅमेझॉनशिवाय इतरी ई-कॉमर्स वेबसाइटवर सॅनिटायझरची विक्री करत होते. अमेरिकेत सॅनिटायझर आणि टॉयलेट पेपरची टंचाई भासत आहे.

अधिक वाचा  मराठा आरक्षण दिले नाही तर…मनोज जरांगे यांचा खणखणीत इशारा