मुंबई, 17 मार्च : केरळ आणि दिल्लीत चे रुग्ण सापडल्यानंतर काही दिवसांनी या जीवघेण्या व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव झाला. आता महाराष्ट्र देशभरातल्या कोरोनाव्हायरसचं केंद्र झालं आहे. महाराष्ट्रात पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शासनाने आणखी कडक पावलं उचलण्याच्या दृष्टीने संपूर्ण लॉक डाउनचा विचार सुरू केला आहे. पण मुळात पहिला कोरोनाव्हायरस महाराष्ट्रात शिरायला केवळ एक चूक किंवा थोडं दुर्लक्ष कारणीभूत ठरलं, असं म्हणावं लागेल.
कोरोनाव्हायरसचा प्रसार देशात पहिल्या टप्प्यात होता, त्या वेळी भारत सरकारने दिलेल्या सूचनांनुसार मुंबई विमानतळावर फक्त 6 कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्या प्रवाशांची तपासणी होत होती. त्यात प्रामुख्याने चीन, इटली, सिंगापूर, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांचा समावेश होता. त्याखेरीज इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नव्हती. बाकीचे विदेशातून येणारे प्रवासी कोणतीही काळजी न घेता किंवा तपासणीशिवाय सरळ समाजात मिसळत होते. नेमकी तीच चूक नडली आणि दुबईमार्गे येणाऱ्या प्रवाशांमधून हा व्हायरस महाराष्ट्रात शिरला.
महाराष्ट्रात सापडलेले पहिले रुग्ण या सहा देशांव्यतिरिक्त देशांतून आलेले आढळले. दुबई, थायलंड, अमेरिका आणि फ्रान्स या देशांतून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदर्शनाला आलं आणि नंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हीच गोष्ट नमूद केली होती. “महाराष्ट्रात सापडेलेल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे केंद्र शासनाच्या यादीत नसलेल्या देशांमधून आलेले आहे. याबाबतीत केंद्राला कळवलं आहे आणि यापुढे ते सर्व देशही या तपासणीच्या यादीत टाकण्याची सूचना केली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने स्वयंशिस्तीने आणि प्रामाणिकपणे स्वतःला 14 दिवस क्वारंटाइन केलं असतं, तर ही वेळ आलीच नसती. लक्षणं दिसलेल्या रुग्णांनीही वेळेवर वैद्यकीय मदत घेतली असती आणि परदेश प्रवासाची माहिती दडवली नसती, तर कदाचित आज वाढलाय इतकाही हा व्हायरस राज्यात वाढू शकला नसता.
मुंबईत दाखल असलेला आणि दुबईला जाऊन आलेला रुग्ण 17 मार्चला दगावला. त्याने आपल्या प्रवासाची माहिती उघड केली नव्हती आणि त्याने स्वतःला वेगळंसुद्धा ठेवलेलं नव्हतं, असं आता उघड होत आहे. त्याच्या बायकोला आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. म्हणूनच स्वयंशिस्त न पाळणं आणि सुरुवातीला नसलेलं गांभीर्य आता अंगाशी आलं आहे. कदाचित आता लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचं समोर येत आहे.