बीजिंग: जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात सुमारे पावणे दोन लाखजणांना करोनाची लागण झाली आहे. विविध देशांमधील शास्रज्ञ करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांना या प्रकरणी मोठं यश हाती आल्याचे वृत्त आहे.
चीनमधून करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर जगभर पसरला. चीनमधील हुबेईसह काही प्रांत बंद ठेवण्यात आले होते. चीनमध्ये करोनाचे लस शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यात आता काही प्रमाणात यश आल्याचे वृत्त चीनमधील साऊथ चायना मॉर्निंग वृत्तपत्राने दिले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याच्या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली. माकडांमध्ये करोनाचे विषाणू माकडांमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्यांत करोना आजाराची लक्षणे दिसू लागली. संसर्ग सुरू झाल्यानंतर त्यांना लस देण्यात आली. या लसीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाल्याचे समोर आले. मात्र, प्राण्यांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग डोळ्यांद्वारे पसरत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. त्यामुळे मास्क लावून करोनाच्या संसर्गाला रोखता येईल की नाही याबाबत खात्री नाही. करोना विषाणूची लस बनविण्यासाठी जगभरात प्रयोग केले जात आहेत. विशेषत: अमेरिका आणि चीनचे शास्त्रज्ञ या शोधात गुंतले असून चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.
माकडांमध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सातव्या दिवशी एका माकडाच्या शरीरात करोनाचे विषाणू पसरू लागले होते. त्याच्या फुफ्फुसापासून ते शरीरातील विविध भागात करोनाचे विषाणू पसरले होते. मात्र, लस देण्यात आल्यानंतर इतर माकडांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली असल्याचे प्रा. किन चुआन यांनी सांगितले. एक महिन्यानंतर काही माकडांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊन ते व्हायरसमुक्त झाले होते. त्यांची करोनाची चाचणी घेतल्यानंतर निगेटिव्ह आली. शरीरातील इतर अवयवही चांगले असल्याचे चाचणी करणाऱ्या पथकाला आढळले.
प्रकृतीत सुधारणा झालेल्यापैकी दोन माकडांना एक महिनाभर तोंडाद्वारे व्हायरस देण्यात आला. त्यांना ताप आला मात्र, इतर कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोन आठवड्यानंतर त्यांची ऑटप्सी करण्यात आली. त्यातही व्हायरस आढळला नाही. त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीने काम केले त्यामुळे त्यांना करोनाची बाधा पुन्हा झाली नसल्याचा असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.
करोनावरील लसीच्या शोधाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे यश असल्याचे प्रा. चुआन यांनी सांगितले. करोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना पु्न्हा करोना झाल्याची काही प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे ही लस त्या रुग्णांनाही उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.