पंढरपूर: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजवर कोणत्याही कारणाने कधीही बंद न झालेले विठ्ठल मंदिर कोरोनामुळे आजपासून बंद करण्यात आले आहे. आज दुपारी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बैठक होऊन मंदिर बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. सदर आदेशानुसार आजपासून देशभरातील भाविकांना विठ्ठल मंदिराची दारे बंद झाली असून आता ३१ मार्च नंतर कोरोनाचे संकट टळल्यास मंदिर उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
आज मंदिराची सर्व दारे बंद करण्यात आली असून आता केवळ देवाचे नियमित असणारे रोजचे नित्योपचार मंदिराचे पुजारी करतील. औरंगजेब, अफझलखान यांच्या यावनी हल्ल्यातही कधी मंदिर बंद झाले नव्हते. प्लेग सारख्या महामारीतही मंदिर बंद केले नव्हते पण देशभरात वाढत असलेले करोनाचे संकट पाहून मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची सर्व धर्माच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील मोठी मंदिरे दर्शनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील मशिदींमधील नमाज आणि चर्चमधील सामूहिक प्रार्थनाही पुढील काळात थांबवण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. सर्व धर्माच्या प्रतिनिधींचा बैठकीत सहभाग होता. दरम्यान, जोतिबाची चैत्र यात्राही रद्द करण्यात आली आहे.