मुंबई: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात कहर केलेला असताना, आपल्या देशात मात्र अशी काही प्रकरणं समोर आहेत की, रूग्ण उपचार घेण्याऐवजी रुग्णालयातून चक्क पळून जात आहेत. नवी मुंबईतील शासकीय रुग्णालयात ११ संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या सर्व प्रकारावर अभिनेता रितेश देशमुख यानं संताप व्यक्त केला आहे.
‘हा एक प्रकारचा बेजबाबदारपणा आहे. सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी तुमची मदत करत आहेत. त्यांना तुमची मदत करु द्या. या आजारामुळं तुम्हाला काही दिवस एकटं रहावं लागत लागणार आहे. हे सर्व तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मित्रपरिवारासाठी, घराताल्यांसाठी करणार आहात. त्यामुळं हॉस्पिटमध्ये तुमच्यावर योग्य उपचार होणार आहेत. सध्याच्या घडीला आपण सर्वच सैनिक आहोत आणि या सर्वविरुद्ध आपल्याला एकत्र येऊन लढा द्यायचा आहे, असं रितेश म्हणाला.
करोनाच्या भितीनं पळून जाणाऱ्या रुग्णांना अभिनेत्री बिपाशा बासू हिनं देखील खडेबोल सुनावले आहेत. ‘लोक इतकं बेजबाबदारपणाणं कसं वागू शकतात? देशाचा एक नागरिक म्हणून आज आपल्याला सतर्क होण्याची जास्त गरज आहे. अशा प्रकारचा बेजबाबदारपणा न करता परिस्थितीचं भान राखायला पाहिजे. आपण सरकारची मदत करायला हवी’ असं अभिनेत्री बिपाशानं ट्विट करून म्हटलं आहे.