मुंबई: सोशल मीडियावरील करोनाशी संबंधित अफवा रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सरकार देत असताना सरकारमधील महत्त्वाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटर हँडलवरून चुकीची माहिती दिली गेल्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारी कार्यालये सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्वीट आव्हाड यांनी मंगळवारी केले. असा कोणताही निर्णय झाला नसल्याने अनेक प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर याबाबत गोंधळाचे वातावरण तयार झाले. मात्र माझे ट्वीटर हँडल संचालित करणाऱ्या शंभुराजे ढवळे यांच्याकडून हा प्रकार झाला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगत आव्हाड यांनी या प्रकरणापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक ट्विटर किंवा फेसबुकवर आपले खाते सुरू करताना त्याची संपूर्ण जवाबदारी ही संबंधित यूजरची असते. आव्हाड यांचे ट्विटर हँडल हे व्हेरीफाइड (बरोबरची निळी खूण असलेले) अकाऊंट आहे. या अकाऊंटवरून सरकारच्या निर्णयाबाबत चुकीची माहिती देण्यात आल्यानंतर त्याची जबाबदारी ते हँडल संचालित करणाऱ्यावर टाकणे कोणत्या नैतिकतेत बसते, असे प्रश्न अनेकांनी फेसबुक आणि ट्विटरवर उपस्थित केले. हे ट्वीट जर ढवळे यांनी केले असेल तर यापूर्वी आव्हाड यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेली किती आणि कोणती ट्वीट ही ढवळे यांनी व किती व कोणती ट्वीट आव्हाड यांनी स्वतः केली, असाही प्रश्न विचारला जात आहे.
सर, मी चुकलो…
हा प्रकार घडल्यानंतर आव्हाड यांच्याच फेसबुक खात्यावरून याचा खुलासा करण्यात आला. त्यामध्ये ‘सर, माझी खरंच चूक झाली, सगळीकडे ती बातमी सुरू होती. दरवेळी प्रत्येक ट्वीट तुम्हाला विचारून टाकतो. परंतु यावेळेस विचारायचे लक्षात राहिले नाही, ही माझी खूप मोठी चूक झाली’, असे म्हटले होते. हा खुलासा कोण कुणासाठी करतो आहे, याबाबतही संभ्रम होता. आव्हाड कुणाला सर म्हणत आहेत की हा खुलासा आव्हाड यांना उद्देशून केला गेला आहे, यावर चर्चा सुरू होती. त्यावर अनेक विनोदही तयार झाले.

अधिक वाचा  शरद पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित ; गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार तर कंत्राटी भरती बंद… जाणून घ्या थोडक्यात