नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. करोना व्हायरससह देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधींनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेरलंय. अंदमान-निकोबारमध्ये त्सुनामी पूर्वी समुद्राचं खाली गेलं होतं तसंच आता सर्वकाही आता तळाला गेलं आहे. यामुळे लवकरच त्सुनामी येणार आहे, असं वक्तव्य राहुल गांधी म्हणालेत.
पुढे काय होणार आहे याचा अंदाज अजून सरकारला आलेला नाहीए. फक्त करोना व्हायरसच नाही तर आर्थिक स्थितीही आणखी वाईट होणार आहे. पुढच्या सहा महिन्यात कल्पना करता येणार नाही, अशा परिस्थितीचा सामना जनतेला करावा लागणार आहे. मोठी आर्थिक त्सुनामी येणार आहे, हे मी आधीच सांगतोय, असं राहुल गांधी म्हणाले.
करोना व्हायरसवरून केंद्राला घेरले
करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलंय. करोना व्हायरसवर सरकारला आधीच इशारा दिला होता. तयारी सुरू करा, असं सरकारला मी सांगत आलोय. पण सरकार उलट सुलट चर्चा करत आहे. यामुळे मी दुखी आहे. पण आगामी काळात इतका मोठा हादरा बसणार आहे ज्यामुळे कोट्यवधी नागरिक संकटात सापडणार आहेत. अर्थव्यवस्थेला मिळालेल्या रेटींगला काही अर्थ नाही. पंतप्रधान मोदींनी आता तरी जागं व्हावं आणि कामाला लागावं, असं राहुल गांधी म्हणाले.
मुडीजने आर्थिक विकास दर घटवला
भारताचा आर्थिक विकास दर २०२० मध्ये आणखी घसरेल, असं अंदाज पत मानांकन संस्था मुडीजने व्यक्त केला आहे. भारताचा आर्थिक विकास यंदा दर ५.३ टक्के राहणार आहे. करोना व्हायरसा जगावर झालेला परिणाम आर्थिक उलाढालींवर होईल, असं मुडीजने म्हटलंय. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये मागणी कमी होईल आणि उद्योगांच्या उत्पादनांवर परिणाम होईल, असं मुडीजने म्हटलंय.

अधिक वाचा  शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू, राहुल गांधी यांचा कोल्हापुरातून कुणावर घणाघात?