नागपूर: करोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुमारे दीड हजार नागरिकांची १४ दिवस कालावधीच्या सक्तीच्या एकांतवासासाठी आमदार निवाससह शासकीय व इतर इमारतीमध्ये विलगीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्यात आमदार निवास येथे २१० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
विलगीकरण केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, आरोग्य विभाग, विमानतळ अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना या बाबत जबाबदाऱ्यांचे वाटपही झाले असून आमदार निवासात पोलिस कक्षही सुरू झाल्याची माहिती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी दिली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. गरज पडल्यास इतर शासकीय इमारतीमध्ये सुद्धा वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
असे आहेत नोडल अधिकारी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करीत नोडल अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात आयसोलेशन वार्डांची निर्मिती तसेच अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष तसेच हेल्पलाइन २४ तास कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी जबाबदारी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार यांच्यावर सोपविली गेली आहे. विदेशातून आलेले प्रवाशांचा पाठपुरावा सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इनामदार, संभाव्य बाधित व्यक्तींची माहिती तसेच संपर्क डॉ. नवघरे, पोलिस विभागासंदर्भातील आवश्यक सहाय्य व पथक नियुक्त करण्यात आले. उपायुक्त श्वेता खेडकर विलगीकरण केंद्राची व्यवस्था उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, आमदार निवास व्यवस्था जनार्दन भानुसे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन सहाय्यक प्रा. डॉ. खडसे, डॉ. मीनाक्षी सिंग व डॉ. सेलोकर, होम क्वारेन्टाइन डॉ. सरला लाड, डॉ. सेलोकर, जनजागृती जिल्हा शल्यचिकित्सक, महानगरपालिका, रेल्वे, राज्य परिवहन, महसूल, आपत्ती प्रतिसाद दल, माहिती व जनसंपर्क, औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्था आदी विभागांचे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
आतापर्यंत ८१ नमुने निगेटिव्ह
कोरोना विषाणूसंदर्भात मंगळवारी १६ संशयित व्यक्ती दाखल झाल्या. त्यामुळे आतापर्यंतच्या संशयितांची संख्या १३१ झाली असून त्यापैकी १६ जण सध्या मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. शिवाय आतापर्यंत आतापर्यंत ८१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार १३१ व्यक्तींचा पाठपुरावा सुरू आहे.

अधिक वाचा  सुषमा अंधारेंचा शाहांवर हल्ला; तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये…