मुंबई: मुंबईचा पारा सातत्याने तिसऱ्या दिवशी ३५ अंशांच्या पुढे आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथे ३७ अंश, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चढता आहे. सोलापुरात मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ३८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर करोना नियंत्रणात येईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र सध्या तरी तापमानवाढ आणि करोना नियंत्रण यातील संबंध प्रस्थापित झालेला नाही. त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात सर्वदूर तापमानवाढ मंगळवारी नोंदवली गेली. अनेक ठिकाणी ३५ अंशांहून अधिक कमाल तापमान होते. मात्र कोकण विभागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीव्र वाढ नोंदवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उन्हात फिरून रापलो तरी चालेल, मात्र करोना जाण्यासाठी तापमान वाढू दे, अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. तसेच भारतातील वातावरण वाढत्या तापमानामुळे कसे सुरक्षित आहे, याबद्दलही चर्चा होत आहे. मात्र याबद्दल कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी तापमानवाढीच्या आधारे करोनावर नियंत्रण याबद्दल कोणतीही बाब सिद्ध झालेली नाही, असे सांगत येत्या ४८ तासांत मुंबईच्या कमाल तापमानात किंचित घट होईल, असे स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रामध्ये प्रति चक्रवात (अॅन्टी सायक्लॉन) प्रणाली तयार झाली आहे. यामुळे मुंबईला बाष्प पुरवठा होणार आहे. परिणामी मुंबईचे तापमान किंचित कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या सरासरीपेक्षा मुंबईकर खूप जास्त तापमानाला तोंड देत आहेत. ते तापमान सरासरीच्या आसपास येण्याचा अंदाज आहे.
मुंबईसह अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात अजूनही मोठा फरक जाणवत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी कमाल आणि किमान तापमानात जेवढी जास्त तफावत तेवढे श्वसनसंस्थेचे आजार अधिक, असे स्पष्ट केले. हे वातावरण विषाणूंसाठी पोषक असते, असेही ते म्हणाले. जोवर तापमानासंदर्भात संशोधन, अभ्यास होत नाही तोवर तापमानावर अवलंबून राहू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
उन्हाळ्यातही सर्दी-खोकला कायम असतो. ताप, स्वाइन-फ्लूही दिसून येतात. उन्हाळ्यात हे आजार दूर होत नाहीत. त्यामुळे असे ठोकताळे बांधले जाऊ नयेत, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले. सुमारे २० वर्षांपूर्वी गोवर, कांजिण्या ही विषाणूजन्य साथ फेब्रुवारीमध्ये तापमानवाढीला सुरुवात व्हायची तेव्हाच आढळायची. नंतर लसीकरण सुरू झाल्यावर ते बंद झाले, याचीही आठवण त्यांनी करून दिली. करोनाचा विषाणू किती तापमानात जगतो, किती तापमानापुढे त्याचा टिकाव लागत नाही याबद्दल सध्या संशोधन सुरू असल्याने अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड शारदीय नवरात्र महोत्सव ‘कारसेवका’ची ‘मनसे’च विजयी ची ‘नवसंकल्पी’घटबांधणी